बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित करू नका:इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे 'पालखेडची लढाई' विषयावर व्याख्यान

0
eb4d3e6b-ca6d-4250-be36-84723c0ac4d5_1777373281780.jpg




इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते जगन्नाथ लडकत यांनी महाप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशवे यांना जातीयवादात मर्यादित न करण्याचे आवाहन केले आहे. बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व जागतिक पातळीवर अनेक योद्धे, सेनापती आणि इतिहासकारांनी वाखाणले आहे. जगातील दहा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये त्यांच्या पालखेडच्या लढाईचा समावेश असून, अनेक देशांच्या युद्धविषयक अभ्यासक्रमांत त्यांच्या लढायांचे दाखले दिले जातात, असे लडकत म्हणाले. पूना गेस्ट हाऊसच्या स्नेह मंचतर्फे बाजीराव पेशवे यांच्या २८६व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर लडकत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रशांत गोऱ्हे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, वीरमाता गौरी गोडबोले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर आणि लेखक शिवप्रसाद मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. लडकत यांनी सांगितले की, कोवळ्या वयात पेशवाईची धुरा सांभाळलेल्या बाजीरावांनी अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात एकही लढाई गमावली नाही. त्यांनी ४० पेक्षा अधिक युद्धे लढली आणि प्रत्येक लढाईत ते विजयी झाले. असा पराक्रम करणारा योद्धा जगात आजवर झाला नाही. श्रीमंत बाजीराव पेशवे केवळ रणभूमीवर शौर्य गाजवणारे नव्हते, तर ते राजकारणकुशलही होते. शत्रूची अचूक माहिती मिळवून, त्याच्या योजना हेरून, कमी सैन्यानिशी अतिशय वेगवान आणि गनिमी काव्याने युद्ध करण्यात ते कुशल होते. त्यांच्या नावाचा उल्लेख होताच शत्रू पळून जात असे, असा लौकिक त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवला. पालखेडची लढाई श्रीमंत बाजीराव पेशवे आणि निजाम यांच्यात झाली. या लढाईत सैन्यबळ कमी असूनही बाजीरावांनी अचूक व्यूहरचना, स्वतःला पूरक युद्धस्थळ निवडण्याची चतुराई, शत्रूला युद्धाआधीच गनिमी काव्याने जेरीस आणण्याची कल्पकता, शत्रूची रसद आणि पाणी तोडण्याची चपळाई दाखवली. अगतिक होऊन शरण आलेल्या शत्रूलाही माणुसकी दाखवण्याचे अतुलनीय धैर्य त्यांच्याकडे होते, याचे दर्शन पालखेडच्या लढाईत घडते. आपल्या मुलखात घुसलेल्या शत्रूला हुसकावण्यासाठी थेट त्याच्या मुलखात घुसून प्रतिशह देण्याचा पराक्रम पेशवे यांनी केला. अनेक पटींनी जास्त सैन्य, अनुभवी सरदार, प्रचंड तोफखाना आणि निजामासारखा कसलेला सेनापती असूनही तरुण वयाच्या बाजीराव पेशवे यांनी पालखेडच्या लढाईत निजामाला पराभूत केले. यावेळी प्रशांत गोऱ्हे यांनी माहिती दिली की, लवकरच पालखेड येथे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारला जाणार आहे. तसेच, एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पेशवे यांचे कर्तृत्व पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed