संधारण विभागाने खासगी शेतीत उभारला विनापरवानगी 60 लाखांचा बंधारा:छत्रपती संभाजीनगरच्या पळशीतील प्रकार, ग्रामसभेचा ठराव नाही; अडीच वर्षांत 11 लाखांच्या पिकांचेही नुकसान
![]()
जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेले अनुदान लाटण्यासाठी चक्क एका शेतकऱ्याच्या ३.५ एकर जमिनीवरच बेकायदेशीर बंधारा उभारला आहे. पळशी येथील राजीव देवलवार असे त्या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. ते गंभीर आजारी असल्याचा गैरफायदा घेत बळजबरीने ६० लाख खर्चून काम केले. आता तर राजीव यांचे निधनही झाले आहे. त्यामुळे एकीकडे राजीव यांची विधवा पत्नी कविता हक्काची जमिन मोकळी करण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. तर दुसरीकडे जलसंधारण अधिकारी मात्र ‘आम्ही बंधाऱ्याचे बिले काढून झाल्यावरच जमीन मोकळी करून देऊ’, असे सांगत आहेत. राजीव व कविता देवलवार पळशीतील गट क्र. १५१ मध्ये २००५ पासून १६.५ एकरात शेती करतात. २०२३ मध्ये जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुना दगडी बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता. याच काळात देवलवारांना कर्करोगाने ग्रासले. ते उपचारासाठी बाहेरगावी होते. याच असाह्यतेचा गैरफायदा घेत अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतातील ३.५ एकरात बंधारा उभारला. २०२४ मध्ये राजीव यांचे निधन झाले. दु:खातून सावरल्यावर कविता शेतात गेल्या तर त्यांना चक्क त्यांच्या संमतीविनाच भव्य गेटेड बंधारा उभारल्याचे दिसून आले. जमीन गेली, मोबदलाही नाही आमची जमीन आहे, गायरान नाही. एकही कागदावर सही नाही. परस्पर शेत बळकावले. पिक गेले आता अधिकारी दाद देत नाही. – कविता देवलवार, शेतकरी माझा काहीही संबंध नाही त्यांची ना हरकत घेऊनच बंधारा बांधला. आता ते खोटे बोलत आहेत. जमीन गायरान वाटली. पण नंतर कळले की, त्यांची खासगी शेती आहे. अनुदान आले की, काढून टाकू. – राजेंद्र नाईकवाडे, निवृत्त उप-अभियंता सर्रास नियम डावलत सुपीक जमीन घेतली नियमानुसार प्रकल्प उभारणे, विकास करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यकत असतो. शिवाय स्थळ पाहणी आणि जमीन मालकाचे ‘ना हरकत’ही घ्यावी लागते. कविता यांच्या बाबतीत यातील एकही प्रक्रिया केली नाही. डोंगर पायथा ते बंधाऱ्यापर्यंत ४० फूट रुंद आणि १२ फूट खोल भव्य नाली खोदल्याने ३.५ एकर सुपीक जमीन बळजबरीने संपादीत केली होती. मात्र विरोधानंतर आता नाला बुजवला पण जमीन आता शेतीयोग्य राहिली नाही. अजब ऑफर त्यांना दिल्याचा दावा तत्कालिन उप-अभियंता राजेंद्र नाईकवाडे आणि कंत्राटदार शैलेश सुरासे यांनी काम केले होते. दिवंगत देवलवार यांच्याकडे त्यांनीच बंधाऱ्याचा प्रस्ताव ठेवला होता. काम करून घ्या, बिल निघाल्यावर पाडून टाकू. अशी अजब ऑफर त्यांना दिली होती. शेतीला पाणी मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी होकार दिला होता. आमची ३५ फळझाडेही तोडली शेतातील ३०-३५ फळझाडेही तोडून टाकली. अडीच वर्षांपासून गहू, ज्वारी, मका अशी पिके घेता न आल्याने ५ लाखांचे त्यांचे उत्पन्न बुडाले आहे. विशेष म्हणजे, ६ लाखांची पदरमोड करून जमीन सपाटीकरण करून घेतले. थेट सवाल- नरेंद्र कटके, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी खासगी जमिनीवर बंधारा का बांधला?
-खासगी नव्हे गायरान जमिनीवर आहे. जमिनीचा मोबदला का नाही दिला?
– गायरान जमिनीचा मोबदला कसा देणार. नियमांचे पालन झाले नाही?
– मला काही सांगता येणार नाही. त्याबाबत नाईकवाडेच सांगतील.
