आठवडी बाजार बंद करून भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव!:अंबादास दानवेंचा आरोप, संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन
![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपरिक आठवडी बाजार बंद करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्यांच्या पोटावर लाथ मारणारा आहे. आठवडी बाजार बंद करून संबंधित भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज शहानुरवाडी येथे तीव्र निदर्शने केली. हा निर्णय रद्द करून गरिबांचा रोजगार वाचवावा, या मागणीसाठी ‘चला रे चला… बाजाराला चला’ असे आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथील ऐतिहासिक आठवडी बाजार कायमचे बंद करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भागात सध्या भाजीपाला मंडईची महापालिकेची कसलिही योजना नाही. तत्पूर्वीच हे बाजार आता बंद केले जाणार आहेत. या निर्णयाविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहानुरवाडी येथील आठवडी बाजारात तीव्र आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला. भाजपचे बिल्डर धार्जिणे धोरण: अंबादास दानवे आंदोलनाचे नेतृत्व करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी भाजपवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, “मागील काही दिवसांपासून भाजपची सत्ता संभाजीनगर महापालिकेत आहे. तेव्हापासून भाजपचे पदाधिकारी आणि त्यांचे संभाजीनगरमधील नेते हे सर्वसामान्य जनतेच्या पोटावर कशा पद्धतीने पाय द्यायचा अशी भूमिका घेतली आहे. बिल्डर धार्जिणे धोरण त्यांचे सुरू झालेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारचा बाजार हा परंपरागत आहे. कित्येक वर्षांपासून तो सुरू आहे. ३० ते ३५ वर्षांपासून हा बाजार भरत असल्याचे मी पाहत आलोय. छत्रपती संभाजीनगर शहरात भाजी बाजार उपलब्ध नाही. महानगरपालिकेचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. शहरात सध्या सुरू असलेले बाजार बंद करून, हे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव भाजपचा आहे. त्याला आम्ही विरोध करत आहोत. त्यासाठी आम्ही आज चला रे चला… बाजाराला चला… असे आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे.” याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर,शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगांवकर, वीरभद्र गादगे, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले व विधानसभा संघटक मीरा देशपांडे उपस्थित होते. हे ही वाचा… आठवडी बाजार बंद झाला तर आत्महत्या करू:छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी व्यापाऱ्यांचा इशारा, नगरसेवक म्हणतात बाजार रस्त्यावर नको, वाचा ग्राउंड रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका आयुक्तांची हुकूमशाही सुरू आहे. आठवडी बाजार बंद झाले, तर आम्ही आत्महत्या करू. आम्ही अफगाणिस्तानचे नसून इथलेच आहोत. आम्ही संपूर्ण आयुष्य या व्यवसायावर काढले. आमची मुले लग्नाला आली आहेत. या धंद्यावर आम्ही कर्ज काढले आहे. जर व्यवसाय बंद झाला, तर आम्ही कर्ज फेडायचे कसे आणि जगायचे कसे असा प्रश्न आम्हासमोर आहे. कामगारांचा पगार कसा द्यायचा. आम्हाला आता कोणी रोजगार देणार नाही. त्यामुळे आम्हाला चोरीचे परवाने द्यावेत. आम्ही चोऱ्या करतो किंवा महापालिका आयुक्तांनी पगार सुरू करावा, अशी मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली. दुसरीकडे नगरसेविकांनी बाजार रस्त्यावर भरू नये, तो गाळ्यात भरावा अशी भूमिका मांडली. सविस्तर वाचा
