नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन:विजय वडेट्टीवारांची टीका; पगारापेक्षा जास्त बोलू नये म्हणत रवी राणा यांचाही पलटवार
![]()
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध आता वैयक्तिक चारित्र्यहननापर्यंत पोहोचले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्या चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमीवरून केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद पेटला आहे. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी वडेट्टीवारांना त्यांच्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला असून, “वायफळ बोलून स्वतःचा कचरा करू नका,” असा टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले, “नवनीत राणा पंतप्रधान मोदींना ‘ठोक’ समजतात, त्यामुळे त्या आम्हाला ‘चिल्लर’ समजतात. नवनीत राणा या ‘सी-ग्रेड’ चित्रपटाच्या प्रसिद्ध हिरोईन आहेत, त्यामुळे त्या ‘ग्रेट’च असणार. त्या पडद्यावरच्या तारांगण असल्यामुळे आमच्यासारखे लोक त्यांच्या दृष्टीने चिल्लरच आहेत.” रवी राणांचा वडेट्टीवांरावर जोरदार पलटवार आपल्या पत्नीवर झालेल्या या टीकेचा समाचार घेताना रवी राणा चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले, “एखाद्या महिलेबद्दल अशा हीन दर्जाची भाषा वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. वडेट्टीवारांना माझे सांगणे आहे की, त्यांनी आपल्या लेव्हलनुसार नीटनेटके राहिले पाहिजे. जेवढा पगार मिळतो, तेवढेच बोलले पाहिजे. आपली पातळी सोडून वायफळ बडबड करून वडेट्टीवारांनी स्वतःचा कचरा करून घेऊ नये.” रवी राणा यांनी पुढे असेही नमूद केले की, सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांचा आदर राखणे गरजेचे आहे, मात्र वडेट्टीवार आपली राजकीय मर्यादा ओलांडत आहेत. या वादामुळे विदर्भातील राजकारण चांगलेच तापले असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीमधून सांस्कृतिक मंत्र्यांना वगळले:आशिष शेलार यांना डावलल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या नावांची पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस करण्याकरिता शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. ही समिती पद्म पुरस्कारांसाठी विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य शासनास करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मात्र, या समितीमधून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना डावलण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्र्यांना प्रक्रियेतून बाहेर ठेवल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा…
