पुणे पोलिसांची ड्रग्ज तस्करांवर मोठी कारवाई:१९ जण अटकेत, ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
![]()
पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत १९ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५८ लाख १८ हजार २५० रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, १ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत परिमंडळ ७ अंतर्गत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. परिमंडळ ७ मधील वाघोली, लोणीकंद, लोहगाव विमानतळ, चंदननगर आणि खराडी या पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही मोहीम चालवण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले. मेफेड्रोन (एम.डी.) आणि गांजाची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले. सुरुवातीला १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून हे अंमली पदार्थ राजस्थानमधून आणल्याचे समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने एक विशेष पथक राजस्थानला पाठवले. तेथे शोध मोहीम राबवून आणखी ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामुळे या संपूर्ण अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, आतापर्यंत एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी २८९.१९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.), ४२२ ग्रॅम गांजा आणि २६० ग्रॅम वजनाची अंमली पदार्थाचे अंश असलेली पावडर जप्त केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५८ लाख १८ हजार २५० रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त (परिमंडळ ७) सोमय मुंडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. अंमली पदार्थांविरोधात अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्या परिसरात कोणीही अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन करत असल्याचे आढळल्यास तात्काळ संबंधित पोलिस स्टेशनला माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले.
