प्रगतिशील शेतकरी:संत्रा-मोसंबीच्या पट्ट्यात कांदा बियाणे, दीड एकरात 5 लाखांची कमाई; हिंगोलीच्या सुभाष गायकवाड यांचा यशस्वी प्रयोग

0
nmcover-placecover-marathi_1777032789.jpg




पारंपरिक पिकांच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी हवालदिल होत असताना, हिंगोलीच्या पारोळा येथील सुभाष गायकवाड यांनी मात्र “पॅटर्न’ बदलून यशाला गवसणी घातली. वर्षाकाठी 12 एकरातून जेमतेम 8 लाखांचे उत्पन्न घेणाऱ्या या शेतकऱ्याने, आता अवघ्या दीड एकर कांदा बीजोत्पादनातून अवघ्या पाच महिन्यांत 5 लाख रुपये कमावलेत. गावाशेजारी तलाव असल्याने गायकवाड यांच्याकडे संत्रा आणि मोसंबीची बाग होती. मात्र, निसर्गाची अवकृपा, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बागेचे सातत्याने नुकसान होत होते. हळद, सोयाबीन, तुरीसारख्या पिकांमधूनही खर्च वजा जाता हाती फारसे काही लागत नव्हते. मेहनतीचा मोबदला मिळत नसल्याने गायकवाड यांनी बीजोत्पादनाकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. एकदाच खताची मात्रा गायकवाड यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये दीड एकर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन सुरू केले. यासाठी 4 हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करून त्याची लागवड केली. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ एकदाच खताची मात्रा दिली. योग्य पाणी व्यवस्थापन आणि देखरेखीमुळे एप्रिल महिन्यात त्यांना साडेसात क्विंटल बियाणांचे उत्पादन मिळाले. हे बियाणे त्यांनी विदर्भातील एका कंपनीला 60 ते 65 हजार रुपये क्विंटल दराने विकले. ज्या 12 एकरातून वर्षभर कष्ट करून 8 लाख मिळायचे, तिथे दीड एकराने 5 लाखांचे बंपर उत्पन्न दिले. कांदा बीजोत्पादनाला खर्च कमी आणि मागणी जास्त असल्याने हे पीक परवडणारे आहे. केवळ योग्य नियोजनाची गरज असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 20 शेतकरी घेणार प्रेरणा सुभाष गायकवाड यांनी या वर्षी या प्रयोगाचा विस्तार करत 5 एकर क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन घेतले आहे. सध्या हे पीक काढणीला आले असून बाजारात 50 हजार रुपये क्विंटलचा दर अपेक्षित आहे. गायकवाड यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर आता पारोळा गावातील सुमारे 20 हून अधिक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा बीजोत्पादन घेण्याचे ठरविले आहे. असे आहे खर्च-उत्पन्नाचे गणित गायकवाड यांनी सुरुवातीला 4 हजार रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करून डिसेंबर महिन्यात दीड एकरात त्याची लागवड केली. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांना साडेसात क्विंटल बियाणांचे दर्जेदार उत्पादन मिळाले. हे बियाणे विदर्भातील कंपनीने 60 ते 65 हजार रुपये क्विंटल या विक्रमी दराने खरेदी केल्यामुळे त्यांना 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 12 एकरच्या पारंपरिक शेतीतून वर्षाकाठी 8 लाख मिळणाऱ्या गायकवाड यांना या प्रयोगामुळे अवघ्या दीड एकरातून मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. (प्रगतिशील शेतकरी सुभाष गायकवाड यांचा संपर्क क्रमांक : 9823600709)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed