पालघर जिल्हा मलेरियामुक्त करणार:विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्याची मोहीम, आरोग्य आणि हिवताप विभाग ‘ॲक्शन मोड’वर
![]()
पालघरः पालघर जिल्ह्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी अजूनही मलेरियाला हद्दपार करण्याचे आव्हान आरोग्य विभाग तसेच हिवताप विभागासमोर आहे. हे आव्हान या दोन्ही विभागांनी आता स्वीकारले असून मलेरिया हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्यात येणार आहे. जगभर २५ एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा करण्यात येतो. पालघर जिल्ह्यातही हिवताप दिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोग्य विभागाचे तसेच हिवताप विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. दर महिन्याला साठ हजार चाचण्या पालघर जिल्ह्यात दर महिन्याला ग्रामीण भागात तीस-पस्तीस हजार, तर शहरी भागात वीस पंचवीस हजार रक्त तपासण्या केल्या जात असतात. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये या तपासण्या होत असून पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिन्यात मात्र बहुतांश वेळी रुग्णांची संख्या एक अंकी असते. गेल्या वर्षी जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मलेरियाचा उदय झाला होता. जिल्ह्याच्या उर्वरित भागात मात्र गेल्या काही वर्षात हिवताप रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. आरोग्य विभागाने तशी माहिती दिली.
स्थलांतरितांत मलेरिया रुग्णांचे प्रमाण जादा पालघर जिल्ह्याबाहेरून स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात मलेरिया रुग्ण आढळून येत आहेत. आता बांधकाम कर्मचाऱ्यांमध्ये वायमॅक्स पद्धतीचे मलेरिया रुग्ण आढळत असल्याने त्यांच्यात व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी जून महिन्यात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांना हिवतापाची लक्षणे, हिवताप रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यात डेंगुचे रुग्ण वाढत असले, तरी मलेरियाला मात्र आळा घालण्यात आरोग्य विभागाला तसेच जिल्हा हिवताप विभागाला यश आले आहे. दीड हजार विद्यार्थी करणार जनजागृती ‘रिलीफ हॉस्पिटल’च्या डॉ. विशाल कोडागिकर यांच्या पुढाकाराने पालघर येथील ‘सुंदरम स्कूल’ व बोईसर येथील चिन्मया विद्यालयातील दीड हजार विद्यार्थ्यांत जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. या आजाराविषयीची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना या संदर्भात माहिती देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या माध्यमातून मलेरिया योद्धा बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अशा विद्यार्थ्यांनी कीटकजन्य रोगाच्या नियंत्रण करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच आपल्या परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, त्यासाठी पालकांची मानसिकता तयार करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने डास निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा असा कार्यक्रम देण्यात आला आहे. आदिवासी, दुर्गम भागात धोका कायम पालघर जिल्ह्यात मलेरियाची परिस्थिती तुलनेने नियंत्रणात असली, तरी आदिवासी व दुर्गम भागामध्ये डासजन्य साथरोगांचा धोका कायम आहे तसेच जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या मजुरांचे प्रमाण खूप असल्यामुळे परराज्यातून जिल्ह्यात साथीच्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मलेरिया निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ताप सर्वेक्षण, रक्त तपासणी, त्वरित उपचार, घराभोवती फवारणी आणि जनजागृती यामुळे संख्या कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग व हिवताप विभाग प्रयत्नशील आहे.
