अशोक खरातने हवेतून काढली काजू कतली:स्वतःच्या CA लाच घातला कोट्यवधींचा गंडा; अखेर त्याचा गेम कसा झाला? वाचा इनसाईड स्टोरी

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-26t11_1777184631.png




भोंदू अशोक खरातने हवेतून काजू कतली काढल्याची हातचलाखी करून एका चार्टर्ड अकाउंटंटलाच गंडा घातल्याचा अजब प्रकार उजेडात आला आहे. या सीएने खरातने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्याचा ठरवून गेम केला. विशेष म्हणजे भोंदू खरातला आपल्याविरोधात जाळे विणले जात असल्याची खबरबातही लागली नाही. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरातचा सीए ललित पोफळे यांनी अत्यंत धाडसाने खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला. खरातने पोफळे यांच्या आई-वडिलांना मृत्यूचा धोका असल्याची भीती दाखवून तब्बल 8 कोटी 76 लाख रुपये उकळले. मुंबईतील वरळी भागात राहणाऱ्या पोळले यांनी या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भोंदू अशोक खरातने 2017 मध्ये हवेतून काजू कतलीचा प्रसाद काढून पोफळे याच्यावर मोहिनी घातली होती. त्यानंतर तुमच्या आई-वडिलांना मृत्यूयोग आहे अशी भीती दाखवली. हा धोका टाळम्यासाठी त्यांना अवतार पूजा करण्याचे सूचवले. खरातच्या फार्महाऊसवर स्वयंपाकी म्हणून हेर ठेवला या पूजेच्या नावाखाली खरातने ललित पोफळे यांच्याकडून तब्बल 4 कोटी 25 लाख रुपये स्वतःच्या व पत्नीच्या खात्यात जमा करून घेतले. एवढेच नव्हे तर त्रिवेंद्रम व वावी येथील दर्ग्यात पूजेच्या नावाखाली त्यांच्याकडून आणखी 2 कोटी 53 लाख रुपये उकळले. कोट्यवधी रुपये हातचे गेल्यानंतर पोफळे यांना खरातच्या वागणुकीवर संशय आला. त्यांनी सत्य शोधण्यासाठी एक विशिष्ट रणनीती आखली. त्यांनी आपल्या ड्रायव्हरच्या ओळखीने एका व्यक्तीला खरातच्या फार्महाऊसवर कुक (स्वयंपाकी) म्हणून नोकरीला लावले. या कुकचा त्यांनी एखाद्या गुप्तहेरासारखा वापर केला. सीए ललित पोफळे यांना या गुप्तहेराच्या माध्यमातून अशोक खरातच्या फार्महाऊसवर होणाऱ्या अश्लील पार्ट्या, त्याचे उच्चभ्रू महिलांशी असणारे अनैतिक संबंध व खरातच्या खऱ्या रुपाचे पुरावे गोळा केले. त्यानंतर ठोस पुरावे हाती लागताच पोफळे यांनी इतर पीडितांच्या मदतीने शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला आणि अशोक खरातच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच तुरुंगाची हवा खाणाऱ्या अशोक खरातच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. अशोक खरातवर अगोदरच गंभीर आरोप स्वतःला ‘कॅप्टन’ आणि ‘कॉस्मोलॉजी’ तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातवर यापूर्वीच लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धेचा प्रसार यासारख्या विविध गंभीर आरोप आहेत. मार्च 2026 च्या अखेरीस त्याला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एका विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. अशोक खरात विरोधात नव्याने दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. तसेच आवश्यकता भासल्यास, चौकशीच्या उद्देशाने तक्रारदाराचा जबाब पुन्हा नोंदवून घेतला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आगामी काळात या प्रकरणाशी संबंधित आणखी काही पीडित व्यक्ती पुढे येण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. भोंदू बाबांच्या प्रकरणांत मोठी वाढ अशोक खरात प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यात भोंदू बाबांविरोधातील तक्रारींचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या प्रकरणी धरणगाव खडग येथील एका मठाचे प्रमुख ‘बाबा महेश गिरी’ यांच्याविरुद्ध एका तरुणीने नुकतीच लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणीचा आरोप आहे की, तिच्या विवाहातील अडथळे दूर करण्याच्या बहाण्याने या बाबाने तिचे शोषण केले. पोलिसांनी महेश गिरी यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’तील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed