Harbhajan Singh | हरभजन सिंगला धक्का, पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय
Harbhajan Singh | आम आदमी पार्टीमध्ये (AAP) सुरू असलेला अंतर्गत कलह आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे. राघव चड्ढा यांच्यासह पक्षाचे तब्बल ७ राज्यसभा खासदार भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने देशाच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. या बंडखोरीचे तीव्र पडसाद आता पंजाबमध्ये उमटू लागले असून, मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांच्यावर पहिली मोठी कारवाई केली आहे.
खासदार हरभजन सिंग यांची सुरक्षा तातडीने हटवली
पक्ष सोडण्याच्या हालचाली सुरू होताच पंजाब सरकारने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत हरभजन सिंग यांना देण्यात आलेली सर्व सुरक्षा मागे घेतली आहे. हरभजन यांचे स्वीय सहाय्यक (PA) मनदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने अत्यंत तातडीने कारवाई करत त्यांच्या घराबाहेर तैनात असलेले सुमारे ९ ते १० सुरक्षा रक्षक तत्काळ हटवले आहेत.
सुरक्षेचा भाग म्हणून त्यांना देण्यात आलेली ‘पायलट कार’ (Pilot Car) देखील सरकारने मागे घेतली आहे.राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण १० खासदारांपैकी जे ७ खासदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेत आहेत, त्यामध्ये हरभजन सिंग यांचे नाव आहे. याच कारणामुळे मान सरकारने हा धडक निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर हरभजन सिंग यांनी अद्याप मौन बाळगले असले तरी, सरकारने थेट सुरक्षा काढल्याने त्यांच्यातील आणि पक्षातील दरी आता अधिकच रुंदावली आहे.
‘पंजाबचा गद्दार’
या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शनिवारी संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी हरभजन सिंग यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या घराच्या भिंतींवर थेट ‘पंजाबचा गद्दार’ असे लिहून आपला संताप व्यक्त केला.
बंडखोर नेत्यांच्या या पावलावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी भाजप आणि बंडखोर नेत्यांवर सडकून टीका केली. “पक्ष सोडून जाणारे हे सर्व खासदार गद्दार आहेत. त्यांनी केवळ आम आदमी पार्टीचाच नाही, तर त्यांच्यावर विश्वास ठेवणारी संपूर्ण पंजाबची जनता आणि त्यांच्या विश्वासाचा घात केला आहे. काही मोजके लोक पक्ष सोडून गेल्याने आम आदमी पार्टी कमकुवत होईल, हा भारतीय जनता पक्षाचा केवळ एक भ्रम आहे.”
News Title: Harbhajan Singh security removed AAP political crisis
