महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू:छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात वैद्यकीय व्यावसायिकांचा उत्साह

0
afd6efa6-2718-4921-875d-17bd7a5383b4_1777191370180.jpg




महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी आज, रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू झाले आहे. या निवडणुकीद्वारे परिषदेत एकूण नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरातून एकूण ६० उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात प्रामुख्याने तीन पॅनेलचा समावेश आहे. निवडणुकीची अधिसूचना २ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ४७७८ वैद्यकीय व्यावसायिक मतदानासाठी पात्र आहेत. येथे आयएमए पॅनलकडून डॉ. उज्वला दहिफळे, तर युवा पॅनलकडून वैजापूरचे डॉ. अमोल अन्नदाते प्रमुख उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. नोंदणीकृत आणि नूतनीकरण केलेले वैद्यकीय व्यावसायिकच या मतदानात भाग घेऊ शकतात. प्रत्येक मतदाराला एकूण नऊ उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान सुरू होण्याच्या एक तास आधी मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मतदानाच्या ठिकाणी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शहर अध्यक्ष किशोर शितोळे, राजू वैद्य, जालिंदर शेंडगे, सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी उपस्थिती लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed