सत्तांतर झाल्यापासून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हिंमत वाढली:धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावर शशिकांत शिंदेंची टीका, म्हणाले- ही कसली शिवभक्ती?

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-26t160052376_1777199417.jpg




नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील ट्विट करत टीका केली आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत, तर ते ‘हिंदुस्थानचे तख्त’ वाचवणारे आणि दिल्लीच्या जुलमी सत्तेला आपल्या पराक्रमाने धडक देणारे युगपुरुष होते.ज्या राजाने शून्यातून स्वराज्य उभे केले,त्या राजाबद्दल अश्लाघ्य वक्तव्ये करून त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान करण्याचे धाडस अलीकडे वाढले आहे. राज्यात अलीकडच्या काळात सत्तांतर झाल्यापासून महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हिंमत कमालीची वाढली आहे हे सर्व ठरवून केलं जात आहे अशी शंका मनात येते. ही कसली शिवभक्ती? सर्वात जास्त संताप या गोष्टीचा येतो की, जेव्हा व्यासपीठावरून बाहेरून आलेले लोक शिवरायांचा अपमान करतात, तेव्हा सत्तेत बसलेली मंडळी त्याच मंचावर माना डोलवत बसलेली असतात! ही कसली शिवभक्ती? महाराजांच्या नावाने मते मागायची आणि त्यांच्याच विटंबनेवर गप्प बसायचे? असा संतप्त सवाल शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. आता धडा शिकवण्याची वेळी आलीये शशिकांत शिंदे म्हणाले, महाराजांना ‘आम्हीच घडवलं’ किंवा ‘आम्हीच त्यांचे गुरु होतो’ असे भासवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. शिवराय स्वयंभू होते आणि राजमाता जिजाऊसाहेबांच्या संस्कारांतून घडलेले जाणते राजे होते, हे विसरणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. बाहेरून येऊन महाराष्ट्रात आमच्या महापुरुषांचा चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांना ही शिवप्रेमी जनता आता सोडणार नाही. फुले-शाहू-आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांनी घडलेला हा महाराष्ट्र अशा भोंदूगिरीला कधीही थारा देणार नाही, असा कडक इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed