[ads1]
हदगाव-तोंडवा मार्गावरील भीषण अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
हिमायतनगर (प्रतिनिधी)- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे जीप चालविताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या सागाच्या झाडांना धडकून पलटी झाल्याची भीषण घटना हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चालकाचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या विशेष अहवालात नमूद आहे. तसेच पाच जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, AP 25 AH 6747 क्रमांकाची महिंद्रा कंपनीची जीप हुडी ते तोंडवा जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होती. घाट संपल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या सागाच्या झाडांना जीपने जोरदार धडक दिली. त्यानंतर जीप पलटी झाली.
या दुर्घटनेत थुम सायन्ना शिवन्ना (६५), थुम गोराबाई चंदर (६५) आणि अब्दुल्ला गंगाधर नरसिमल्लू (६०) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पार्डी मंडळ, कुबेर, ता. मुधोळ, जि. निर्मल (तेलंगणा) येथील रहिवासी असल्याचे अहवालात नमूद आहे.
अपघातात व्यापर मोनाजी कानोबा (६५), सुनगुरी शंकर भोजन्ना (६८), पुष्पाबाई रामाराव गड्डे (५०), थुम मतुबाई सायन्ना (५८) आणि पंडलीक बरलाम रामलू (६५) हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी तलशीराम पटेल गंगाधर पटेल (२७), रा. पार्डी मंडळ, कुबेर, ता. मुधोळ, जि. निर्मल (तेलंगणा) याच्याविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहवालानुसार आरोपी चालकाचाही मृत्यू झाला आहे.
या घटनेचा तपास सपोनि रमेश बी. जाधवर करीत असून, पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.
Post Views: 4
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad