वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावर खोदले चर:लासूरगाव परिसरातील माफियांचे धाबे दणाणले, 20 दिवसांत 7 वाहनांवर कारवाई
![]()
शिवना आणि गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी एप्रिल महिन्यात २० दिवसांत सात वाहनांवर रंगेहाथ कारवाई केली. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले. लासूरगाव येथील श्री देवी दाक्षायणी मंदिराच्या हद्दीतील जानकाई घाट परिसरात शिवनानदीतील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे छुपे रस्ते शुक्रवारी (दि. २४) जेसीबीच्या साह्याने चारी मारून मोडीत काढले. या कारवाईने परिसरातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कारवाई वेळी मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, वसंत भाऊ, बबन आगवणे, आदिनाथ वाघुडे उपस्थित होते. तहसीलदार सावंत यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये साधारण २० दिवसांत सात वाहनांना अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना पकडून दंडात्मक कारवाई केली. यापैकी चार कारवाया लासूरगाव भागातील शिवना नदी पट्ट्यात झाल्या. तीन कारवाया गोदावरी काठ परिसरात झाल्या. वाळूमाफियांचे नेटवर्क मोडण्यासाठी सावंत यांनी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या.
