खरात प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा:तिवस्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

0
334567d3-c981-445f-b3bb-98fa3f2b51ca_1777135025142.jpg




नाशिक येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिवसा येथे विविध राजकीय पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदन देण्यापूर्वी झालेल्या बैठकीत एक ठराव मांडण्यात आला. या ठरावानुसार, स्वतःला सिद्धपुरुष म्हणून सादर करणाऱ्या खरातने राजकीय पाठबळाच्या जोरावर महिलांवर संघटित पद्धतीने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यात महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांचा गैरवापर, तसेच गुंगीची औषधे देऊन अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून केवळ एका आरोपीवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणातील इतर आरोपींनाही तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली. याशिवाय, राज्यातील विविध भागांतील महिला अत्याचार, मानव तस्करी आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांकडेही लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्यातील इतर काही प्रकरणांचा उल्लेख करत, ही सर्व प्रकरणे संघटित गुन्हेगारीचे उदाहरण असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे पदाधिकारी काॅ. प्रकाश सोनोने, श्रीराम (शेतू) देशमुख, विलास माहोरे, अजय सुरटकर, जितेंद्र कोरडे, दिलीप गोहत्रे, नवाजखान पठाण, सुरेश कळसकर, आशिष माहोरे, देवेंद्र आमले, देविदास निकाळजे, नितीन वानखडे, अंबादास जुवारे, यशपाल पुनसे, चंद्रकांत वडसकर आदींच्या स्वाक्षरी आहेत. दरम्यान, गुरुदेवनगर परिसरातील एका प्रकरणातही संबंधित आरोपी फरार असून, त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच, काही राजकीय नेत्यांकडून धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने केली जात असल्याचा आरोप करत, अशा वक्तव्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed