काॅर्पाेरेट जिहाद:‘क्रोनोलॉजी’ उघड; 4 संशयितांना कोठडी, शिरखुर्म्यातून नशा, ब्लॅक मॅजिकचाही दिला सल्ला
![]()
‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील चार संशयितांना बुधवारपर्यंत (२९ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी संशयित तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी, रझा रफिक मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. ‘इनकॅमेरा’ झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली. जिहाद प्रकरणात एका पुरुषाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सातव्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पीडित युवकाला संशयित तौसिफ अत्तार याने शिरखुर्मा दिल्यानंतर त्याचे डोके जड झाले आणि नशा आल्यासारखे वाटले. याच अवस्थेत डोक्यावर धर्माची टोपी ठेवून नमाज पठण करण्यास भाग पाडले. याचे फोटो ‘अॅक्सिस नाशिक’ ऑफिस ग्रुपवर शेअर करून मानसिक त्रास दिला. तरुणाला कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी मांस खाऊ घालण्यासाठी नेले होते. अत्तार आणि शेख हे दोघे स्वतःची कामे पीडित तरुणाकडून करून घेत होते. नकार दिला तर चुकीचा रिपोर्ट पाठवून करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत होते. सरकारी अभियोक्ता अॅड. किरण बेंडभर यांनी केलेल्या युक्तिवादात वरील मुद्दे मांडण्यात आले. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित खाजगी बँकेने घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली. संशयित आरोपींनी पदाचा गैरवापर करून कनिष्ठ कर्मचाऱ्याचे शोषण केल्यामुळे कंपनीच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’चे उल्लंघन झाले आहे का, याची पडताळणी केली जात आहे.
