मौदा येथे उभ्या ट्रेलरला कंटेनरची धडक:आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू, क्लीनर जखमी
![]()
मौदा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. एका कंटेनरने उभ्या ट्रेलरला धडक दिल्याने तात्काळ आग लागली आणि कंटेनर चालकाचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना रात्री सुमारे साडेदहा वाजता उड्डाणपुलाजवळ घडली. नागपूरहून भंडाराच्या दिशेने जाणाऱ्या (एमएच ४०/सीएम १६५६) क्रमांकाच्या कंटेनरने पुलाच्या सुरुवातीला उभ्या असलेल्या (०१ एच/००६९) क्रमांकाच्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कंटेनरने तात्काळ पेट घेतला. या भीषण आगीत कंटेनरचालक संजय कुमार सूर्यबली बिंद (वय ३०, रा. आझमगड, उत्तरप्रदेश) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. क्लीनर सुजित गोरख बिंद (वय २४) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा मोठा आवाज ऐकून मौदा आणि चिचघाट पुनर्वसन वस्तीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाने तातडीने आग विझवली, परंतु तोपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उड्डाणपुलाजवळ अनधिकृत पानटपऱ्या, चहाच्या गाड्या आणि रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने वाहतुकीत अडथळे निर्माण करतात. स्थानिकांच्या मते, महामार्ग पोलीस या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहेत. अर्जुननगर आणि शिवनगरकडे जाणाऱ्या नागरिकांची या मार्गावर सतत वर्दळ असल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याची तक्रारही स्थानिकांनी केली आहे. माथनी टोल नाक्यावर वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात असला तरी, मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महामार्गावरील पथदिवे बंद असणे, साइड रोडची दुरवस्था, अपघाताच्या वेळी तात्काळ प्रतिसाद न मिळणे, तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणेचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
