महसूल सहाय्यक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला:नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात एसीबीची धडाकेबाज कारवाई

0
5afa4151-3260-45b4-b5ec-0b37b4f6f86f_1777122685347.jpg




नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ₹५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली. तक्रारदाराच्या शिवाजीनगर, महाल परिसरातील नझुल प्लॉटवरील बांधकाम प्रकरण निकाली काढण्यासाठी आरोपीने ₹५,००,००० ची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपीने लाचेची मागणी केल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, २४ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. आरोपीने तक्रारदाराला रात्री उशिरा स्वतःच्या निवासस्थानाजवळ बोलावून लाच रक्कम आणण्यास सांगितले. नियोजनानुसार, रात्री सुमारे ११.३० वाजता तक्रारदाराकडून ₹५ लाखांची रक्कम स्वीकारताना आरोपीला पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. आरोपीच्या अंगझडतीत ₹५ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये ५०० रुपयांच्या १०० खऱ्या नोटा आणि उर्वरित बनावट नोटांचा समावेश होता. तसेच आरोपीकडून अॅपल कंपनीचा आयफोनही जप्त करण्यात आला आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती सुरू असून, अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक भारती गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, तपास पोलीस निरीक्षक विवेक पडघान करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed