'आधुनिक भारतासमोरील आव्हाने' पुस्तकाचे प्रकाशन:प्रफुल्ल केतकर म्हणाले, आत्मबोध जागृत करून शत्रूबोध ओळखणे गरजेचे

0
20952066-c219-494c-9db5-12b0fc9a47dc_1777118484667.jpg




ज्येष्ठ विचारवंत आणि साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी ‘आधुनिक भारतासमोरील आव्हाने’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी महत्त्वाचे प्रतिपादन केले. भारतीयांनी आपला ‘आत्मबोध’ जागृत करून खऱ्या ‘शत्रूबोधा’ची ओळख करून घेणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) दृक-श्राव्य सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सागर शिंदे, डॉ. पंकज जयस्वाल, रूपाली भुसारी आणि योगेश्वर घोगले यांनी ‘आधुनिक भारतासमोरील आव्हाने’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. केतकर यांनी नमूद केले की, सध्या भारतीयांचा आत्मबोध क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाची जाणीव नाही. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य यांनाच असा आत्मबोध होता. आजच्या काळात आपला आत्मबोध पक्का करणे आणि समाजाला खऱ्या शत्रूंची ओळख करून देणे हे मोठे आव्हान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, नेहरूंच्या काळात स्वधर्म, स्वदेशी आणि स्वभाषा या संकल्पना कमकुवत झाल्या होत्या आणि भारतीय असण्याची लाज वाटू लागली होती. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. ‘मेरा ही सही’ हा अभारतीय विचार असून ‘मेरा भी सही’ हा उदात्त भारतीय विचार आहे. ‘सर्वे भवंतु सुखिन:’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ ही मूल्ये केवळ भारतातच जोपासली जातात, असेही त्यांनी सांगितले. या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे प्रसिद्ध लेखक अभिजीत जोग यांनी यावेळी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. इतिहास हा संघर्षाच्या विचारधारांमधूनच घडतो, असे ते म्हणाले. एकच विचारधारा उरेल आणि ती राबवता येईल, ही समजूत चुकीची असल्याचे त्यांनी नमूद केले. जोग यांनी शहरी नक्षलवाद, जागतिक बाजारपेठ व्यवस्था, ख्रिश्चॅनिटी आणि मूलतत्ववादी इस्लाम या चार निरंकुशतावादी शक्तींचा उल्लेख केला. या शक्ती आपापसात स्पर्धक असल्या तरी भारताविरुद्ध मात्र त्या एकत्र येतात, कारण भारताचा विचार त्यांच्या निरंकुशतेला उत्तर देतो, असे त्यांनी सांगितले. या शक्तींचा मुख्य उद्देश प्रत्यक्ष युद्ध नसून अंतर्गत बंडाळी माजवून समाज उद्ध्वस्त करणे आणि राष्ट्र संपवणे हा आहे, असेही जोग यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed