मुख्यमंत्र्यांनी किती लपूनछपून भेटी घेतल्या हे सर्वश्रूत:नोटीस पाठवा, मग बघू, 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचे मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर
![]()
प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने 22 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत प्रबुद्ध भारतवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यावर संपादक जीतरत्न पटाईत यांनी मुख्यमंत्र्यांकडून पाठवण्यात येणाऱ्या संभाव्य नोटीसीला योग्य ते प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने 22 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री 2 वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी सूचक प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षपणे या भेटीला दुजोरा दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही यावर उडवाउडवीचे उत्तर दिल्याने या भेटीबाबत संशय अधिक गडद झाला. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही भेट नाकारली आहे. येऊ द्या नोटीस, मग बघू – जीतरत्न पटाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्तावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रबुद्ध भारतवर कारवाईचा इशारा देत संबंधित वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना प्रबुद्ध भारतचे वृत्त संपादक जीतरत्न पटाईत यांनी आक्रमक भूमिका घेत, “मुख्यमंत्री म्हणत आहेत बातमी खोटी आहे, नोटीस पाठवणार आहेत, तर येऊद्या नोटीस… मग बघू,” अशी ठाम प्रतिक्रिया दिली आहे. पटाईत यांनी पुढे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना, “मुख्यमंत्र्यांनी याआधी किती लपूनछपून भेटी घेतल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अमृता फडणवीस यांनीदेखील विविध प्रसंगी त्याबाबत खुलासे केले आहेत,” असा दावा केला. या प्रकरणामुळे पत्रकारिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रबुद्ध भारतने मांडलेल्या वृत्तावरून राजकीय वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. आता या कथित नोटीसप्रकरणी पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते मुख्यमंत्री? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर होते. पत्रकारांनी तिथे त्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या मध्यरात्रीच्या भेटीविषयी प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मला भेटायचे असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती ओपनली देखील केली जाऊ शकते. आमच्यात असे लपवण्यासारखे कोणतेही विषय नाहीत. अशा प्रकारची कुठलीही भेट घडली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने आखोट्या बातम्या देत आहेत. त्या खोटारड्या हँडल्सला नोटीस बजावली जाईल, असे ते म्हणाले.
