पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:मंचर ते जुन्नरपर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या दोन टोळ्या गजाआड, 23 गुन्हे उघड, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त!

0
0b4564f9-9fc6-4f58-8716-869422f9f729_1777101363292.jpg




पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोडी, चैन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत टोळ्यांतील गुन्हेगारांना अटक करून एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 20 तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि गॅस सिलेंडरसह 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंचर आणि आसपासच्या परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण वापरले. यातून दोन संशयित निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मंचर येथून हर्षल दत्तात्रय तांदळे (वय 25, रा. मंचर) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय 25, रा. मंचर) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी मंचर, नारायणगाव, घोडेगाव, पारगाव, आळेफाटा आणि जुन्नर पोलिस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये नारायणगाव (5), घोडेगाव (6), मंचर (4), जुन्नर (2), पारगाव (2) आणि आळेफाटा (4) येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी हर्षल तांदळे याच्यावर यापूर्वी 7 गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचा आदेश झुगारून तो पुन्हा गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे तपासात समोर आले आहे. दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी पीयुष बिरम नानावत (वय 19, रा. कामशेत, मावळ) याला ताब्यात घेतले. पीयुष हा सराईत गुन्हेगार असून, त्याने एका अल्पवयीन साथीदारासह मावळ परिसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 9 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण भागातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed