लखपती बनण्याचा शॉर्टकट की गुन्हेगारीचा महामार्ग? हा व्याजाचा धंदा
नांदेड (प्रतिनिधी)-आजच्या गतिमान, डिजिटल आणि प्रगतीच्या घोषणांनी गाजणाऱ्या युगात प्रत्येकाला लखपती व्हायचं आहे. मेहनत, कौशल्य, शिक्षण, उद्योग हे सगळे शब्द आता जुने झालेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्या सर्वात सोपा, सर्वात वेगवान आणि सर्वात ‘कायदेशीर दिसणारा’ व्यवसाय म्हणजे व्याजाचा धंदा.
होय, तोच धंदा जिथे १०,००० रुपये देताना हातात ९,००० दिले जातात आणि उरलेले १,००० रुपये सेवा शुल्क नावाने आधीच परत घेतले जातात. आणि दररोज १००० रुपये असे १०००० पत्र द्यायचे म्हणजे पैसा देणारा देव आणि घेणारा कायमचा गुलाम. कर्ज देताना हसू, पण वसुली करताना डोळ्यात लाल अंगार हीच या व्यवसायाची खरी ओळख बनली आहे. आज नांदेड सारख्या सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात आणि जिल्ह्यात ही हा सावकारीचा संडास उघड्यावर वाहतो आहे. सकाळी पूर्ण रोड परिसरातील आज मध्यरात्री नवी वाडी भागात घडलेला खून हा फक्त एक गुन्हा नाही; तो समाजाच्या कुजलेल्या आर्थिक व्यवस्थेचा परिणाम आहे. प्रश्न असा आहे की खून करणारा दोषी की त्या परिस्थितीला जन्म देणारी व्यवस्था?
आज व्याजाच्या नावाखाली चालणारा हा उद्योग म्हणजे आधुनिक गुलामगिरीच आहे. बँकांच्या कागदपत्रांची भीती दाखवून, गरीबांच्या अडचणींचा फायदा घेऊन, रोजंदारी कामगार, छोटे व्यावसायिक, रिक्षाचालक, मजूर यांना पैशाच्या जाळ्यात अडकवले जाते. आत्ता पैसे घे, हळूहळू दे अशी गोड भाषा वापरली जाते; पण नंतर सुरू होते मानसिक छळाची, धमक्यांची आणि अपमानाची परंपरा. या व्यवसायाचे विशेष म्हणजे याला ना स्पष्ट नियम, ना नियंत्रण, ना जबाबदारी. कोणत्याही गल्लीत दोन खुर्च्या, एक वही आणि मोबाईल घेतला की माणूस फायनान्सर बनतो. सरकारच्या नजरेसमोर उघडपणे चालणाऱ्या या सावकारीला कोणीही लगाम घालत नाही. पोलिसांना माहिती असते, प्रशासनाला कल्पना असते, पण कारवाई मात्र फाईलमध्येच अडकलेली असते.
व्याजाचा दर असा की गणितज्ञ सुद्धा गोंधळून जाईल. १० हजार घेतले की परत २० हजार द्यायचे. हप्ते चुकले की व्याजावर व्याज. शेवटी माणूस पैसे फेडत नाही, तर स्वतःचे आयुष्य फेडू लागतो. घर विकले जाते, दागिने जातात, नातेवाईक तुटतात आणि शेवटी उरतो तो फक्त नैराश्य. काही जण आत्महत्येकडे वळतात, काही गुन्हेगारीकडे, आणि काहींचा शेवट खूनासारख्या घटनांत होतो. समाजात गुन्हेगारी वाढतेय यावर मोठमोठ्या चर्चा होतात. सीसीटीव्ही वाढवा, पोलिस वाढवा, कायदे कडक करा अशा घोषणा दिल्या जातात. पण गुन्ह्याच्या मुळाशी असलेला हा आर्थिक शोषणाचा कारखाना कोणी बंद करण्याची हिंमत दाखवत नाही. कारण हा धंदा फक्त गल्लीतील सावकारांपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो आता प्रभावशाली लोकांच्या संरक्षणाखाली वाढत चालला आहे.
आज एखादा तरुण पाहतो की मेहनतीने पगार कमावणारा माणूस महिनाअखेरीस रिकाम्या खिशाने फिरतो, पण व्याजावर पैसा फिरवणारा काही वर्षांत गाडी, बंगला आणि प्रतिष्ठा मिळवतो. मग त्यालाही वाटते काम कशाला करायचं? पैसा पैशातूनच कमवायचा. अशा विचारातूनच नव्या पिढीचा नैतिक ऱ्हास सुरू होतो. व्याजाचा हा व्यवसाय म्हणजे समाजाच्या शरीरात हळूहळू पसरत जाणारा कर्करोग आहे. सुरुवातीला तो मदत वाटतो, नंतर सवय बनतो आणि शेवटी विनाश घडवतो. आज जर यावर कठोर नियंत्रण आणले नाही, परवाना प्रणाली लागू केली नाही, आणि बेकायदेशीर सावकारीवर कठोर शिक्षा दिली नाही तर उद्याचे शहर हे गुन्हेगारीचे अड्डे बनण्यास वेळ लागणार नाही.
खून, मारामाऱ्या, आत्महत्या या घटना अचानक घडत नाहीत; त्या अन्यायाच्या, शोषणाच्या आणि आर्थिक दडपशाहीच्या पोटातून जन्म घेतात. त्यामुळे फक्त गुन्हेगार पकडून प्रश्न सुटणार नाही. गुन्ह्याला जन्म देणाऱ्या सावकारी व्यवस्थेवर घाव घालणे आवश्यक आहे. आज गरज आहे ती समाजाने जागे होण्याची. जलद पैसा या मोहातून बाहेर पडण्याची. प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आणि सामान्य नागरिकांनी अशा अवैध सावकारीला थारा न देण्याची. अन्यथा उद्या प्रत्येक गल्लीत एक सावकार आणि प्रत्येक घरात एक बळी दिसेल.
कारण शेवटी सत्य एकच आहे—
व्याजाच्या पैशाने उभा राहणारा बंगला दिसायला भव्य असतो, पण त्याच्या पाया खाली अनेकांच्या अश्रूंची चिखलमाती दडलेली असते.
संबंधित बातमी ….
Post Views: 263
