Vadettiwar Slams Dhirendra Shastri for Shivaji Maharaj Insult
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर तीव्र टीका करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शिवरायांच्या पर
.
वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली. त्यांनी नमूद केले की, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही आणि इमादशाहीसह मोगल तसेच इंग्रज, डच आणि फ्रेंच सत्तांनाही शिवरायांच्या पराक्रमापुढे नतमस्तक व्हावे लागले होते. असा जाज्वल्य इतिहास असताना सार्वजनिक मंचावरून शिवरायांच्या कार्याचे अवमूल्यन करणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी कार्यक्रमातील उपस्थितांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या कार्यक्रमात मोहन भागवत यांच्यासह काही मान्यवर उपस्थित होते, मात्र अशा वक्तव्यावेळी कोणीही हस्तक्षेप का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संशय व्यक्त करत त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
वडेट्टीवार यांनी पुढे आणखी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी या प्रकारामागे काही विचारसरणीचा प्रभाव आहे का, असा प्रश्न उपस्थित करत हा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित विषय असल्याचे म्हटले. अशा वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो, त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, छत्रपतींचा वारसा सांगणारे नेते या विषयावर मौन का बाळगून आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
विजय वडेट्टीवार यांची पोस्ट देखील पहा…
छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी स्वराज्य उभे केले होते. स्वराज्य उभारताना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही इमादशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल, प्रदेशातून आलेले इंग्रज, डच, फ्रेंच या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर गुडघे टेकले. हा जाज्वल्य इतिहास असताना धीरेंद्र शास्त्रीने सार्वजनिक मंचावरून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान केला.
सर्वात संतापजनक म्हणजे मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री गडकरी, संघाचे सरसंघचालक मंचावर बसलेले असताना धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू होता. असे असताना यातील कोणीही धीरेंद्र शास्त्रीला अडवले नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा मनुवादी भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का? महाराष्ट्र धर्माला संपवण्याचा हा घाट आहे का? या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे, महाराष्ट्र धर्माला नख लावणाऱ्या प्रत्येक वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे!
स्वतःला छत्रपतींचे वंशज म्हणवणारे ते संजय गायकवाड कुठे आहेत? धीरेंद्र शास्त्रीला ढगात कधी पोहोचणार आहेत? या भोंदूला शिव्या द्या दणकून महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल.. आहे का हिंमत?
राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगली
दरम्यान, हा वाद नागपूरमधील एका कार्यक्रमानंतर सुरू झाला आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराच्या शिलान्यासानंतर आयोजित धर्मसभेत धीरेंद्र शास्त्री यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील संवादाचा एक प्रसंग सांगितला.त्यांच्या कथनानुसार, युद्धांमुळे थकलेले शिवाजी महाराज आपल्या गुरुंकडे गेले आणि राज्याची जबाबदारी सोपवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर रामदास स्वामींनी गुरु-शिष्य नात्याचा संदर्भ देत पुन्हा राज्यकारभाराची जबाबदारी शिवरायांनाच पार पाडण्यास सांगितले, असा संदेश त्यांनी दिला. या कथेमुळे निर्माण झालेल्या वादामुळे आता राज्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा रंगली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संबंधीत इतरही बातम्या वाचा….
