स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायतसमोर सरण; २५ तासांपासून पार्थिव ठेवून संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
नांदेड | प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील दापशेड गावात माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. गावात स्मशानभूमी नसल्यामुळे एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जागाच मिळाली नाही. अखेर हतबल झालेल्या नातेवाईकांनी पार्थिवदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवत तेथेच सरण रचून आंदोलन सुरू केले. तब्बल २५ तासांपासून मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयातच ठेवण्यात आल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.
दापशेड गावात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या महादेव कोळी समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीसाठी वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याबाबत अनेक वेळा तहसील कार्यालय व ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. अखेर मृत्यूच्या दुःखातही न्यायासाठी लढण्याची वेळ संबंधित कुटुंबावर आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरण रचत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. “जिवंतपणीही दुर्लक्ष आणि मृत्यूनंतरही अपमान?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी निषेध नोंदवला. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही अंत्यविधीसाठी जागा नसल्यामुळे त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब ठरत आहे. “मृत व्यक्तीलाही सन्मानाने निरोप देण्याचा हक्क आहे,” अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी तातडीने स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दापशेड गावाला न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
