अमित ठाकरेंना मारहाणीचा बॅच मिळालाय का?:वकील गुणरत्न सदावर्ते यांचा तिखट सवाल? 'राज ठाकरेंची औलाद' म्हणत साधला निशाणा
![]()
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संपात मराठी रिक्षा चालकांची अडवणूक करणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंची औलाद मारण्याची भाषा बोलते. अमित ठाकरे हवालदार झालेत? की आरटीओचे शिपाई? त्यांना कुणालाही मारहाण करण्याचा बॅच मिळालाय का? असे ते म्हणालेत. वकील गुणरत्न सदावर्ते व मनसेच्या पदाधिकाऱ्यांत गुरुवारी रस्त्यावरच बाचाबाची झाली होती. या वादानंतर मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित ठाकरे यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संपात मराठी रिक्षा चालकांना रोखणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. सदावर्ते यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. तसेच त्यांना सर्वसामान्य रिक्षा चालकांना मारहाण करण्याचा बॅच मिळालाय का? असा सवालही उपस्थित केला. राज ठाकरेंची औलाद मारण्याची भाषा बोलते गुणरत्न सदावर्ते शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, राज ठाकरेंची औलाद काय भाषा बोलते, मारुन काढू. अमित ठाकरे हवालदार झालेत का? त्यांचे बोलणे सुज्ञपणाचे नाही. तुम्ही हवालदार झाला आहात की आरटीओचे शिपाई झालात? अमित ठाकरे यांना मारहाणीचा बॅच मिळालाय का? मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर मारहाणीची भाषा करणारे नेते किती जणांच्या घरी जातात? आम्ही कष्टकऱ्यांच्या बाजूने उभे आहोत. त्यांच्यावर कुणीही हात उचलायचा नाही. अन्यथा कुणीही सुटणार नाही. मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही टीका गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयावरही निशाणा साधला. रिक्षाचालकांना रिक्षावाला नाही, तर रिक्षावाले साहेब बोला. कुणी कुठे राहावे, कुठे पोट भरावे हे सांगणारे तुम्ही कोण? तुमचे पोट भरण्यासाठी ईडी यंत्रणा लागतात का? माहिती नाही. पण कष्टकरी मेहनत करतात. प्रताप सरनाईक यांनी कोणतीही गोष्ट गृहीत धरू नये. शिवसेनेतील लोक सरनाईक यांच्या बाजूने नाहीत. संजय निरुपमही परिवहन खात्याच्या निर्णयाविरोधात बोलले आहेत. हिंदी, मराठीवरून काही लोकांची इतरांना त्रास देण्याची इच्छा आहे. एखादी भाषा शिकण्यासाठी गोडवा हवा असतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीत तो गोडवा नाही. माणसाला छडी मारून शिकवता येत नाही. प्रताप सरनाईक यांना काय बोलावे? ते परिवहन खात्याचे नव्हे तर शालेय शिक्षण विभागाचे काम करत आहेत. भोजपुरी भाषा ही शेड्यूल 10 मध्ये टाकावी अशी आमची मागणी आहे. मराठी भाषेच्या सौंदर्याबाबत कुणाचेही दुमत नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
