अशोक खरातच्या वकिलांचा कोर्टात संताप:प्रत्येक वेळी, तेच पाणी-तेच पेढे का काढता? एसआयटीवर हल्ला; तरीही 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
![]()
धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सहाव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने खरातचा ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, तपासासाठी आणखी वेळ देण्याची मागणी मान्य केली आहे. आजची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. या प्रकरणात कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात एका महिलेला गुंगीचे पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडितेला पाणी, पेढे आणि इतर पदार्थ देत तिला बेशुद्ध करून गैरप्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी एसआयटीने आरोपीची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादात सांगितले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपी महिलांना दैवी शक्ती असल्याचे सांगून घाबरवत होता. तसेच पीडितेच्या कुटुंबावर संकट येईल, अशी भीती दाखवत तो दबाव टाकत होता. या प्रकरणात आणखी कोणते प्रकार घडले आहेत, याचा शोध घेण्यासाठी आरोपीचा प्रत्यक्ष ताबा आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात संताप
दरम्यान, बचाव पक्षाने या मागणीला तीव्र विरोध दर्शवला. अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात संताप व्यक्त करत म्हटले की, सर्व प्रकरणांमध्ये सारखेच आरोप आहेत. तेच पाणी आणि तेच पेढे, अशा प्रकारचे आरोप प्रत्येक वेळी करण्यात येत आहेत. एसआयटीला काही नवीन सापडत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आर्थिक बाबींचा उल्लेख नसताना त्या मुद्द्यांवर तपास केला जात असल्याचीही टीका त्यांनी केली. यावर तपास अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर देताना प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळ्या महिला पीडित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे. आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याचा ताबा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या युक्तिवादानंतर न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांची बाजू ग्राह्य धरली. 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या निर्णयामुळे तपास यंत्रणांना आणखी वेळ मिळाला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
