भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात:मंगळवेढ्यात 18 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण खून, दिव्यांग भावाला चिडवण्यावरून वाद

0
screenshot-2026-04-24-131137_1777016568.jpg




सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या दिव्यांग भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या सुजीत सुभाष राठोड या 18 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. लमाणतांडा (बालाजीनगर) येथे ही खळबळजनक घटना घडली. ही घटना 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामपंचायतीसमोरील एका हॉटेलजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शशिकांत शिवाजी पवार याने सुजीतचा दिव्यांग भाऊ, रणजीत राठोड याला विनाकारण चिडवण्यास सुरुवात केली. रणजीतच्या डोक्यावरील टोपी काढून त्याला त्रास दिला जात होता. या प्रकाराचा निषेध म्हणून रणजीतने आरोपीच्या दुचाकीला लाथ मारली, ज्यावरून वादाला तोंड फुटले. डोक्यावर दगडाने केले वार आरोपी शशिकांतने रणजीतला मारहाण करण्यास सुरुवात केल्यावर, सुजीत आपल्या भावाच्या मदतीला धावून गेला. मात्र, यावेळी शशिकांतसह त्याचे अन्य दोन साथीदार आशिष शिवाजी पवार आणि सागर राम राठोड यांनी सुजीतला घेरले आणि त्याला बेदम मारहाण केली. रागाच्या भरात शशिकांतने सुजीतच्या डोक्यावर दगडाने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे सुजीत जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू जखमी सुजीतला तातडीने आधी मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी मृत तरुणाचे वडील सुभाष उमाजी राठोड यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शशिकांत पवार, आशिष पवार आणि सागर राठोड या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. जुन्या वैमनस्यातून आणि किरकोळ वादातून एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed