सरकारकडून केरोसीन देण्याची घोषणा, पण घाटलाडकीत पोहोचले नाही:सिलिंडरप्रमाणेच नागरिकांना करावी लागतेय प्रतीक्षा

0
370310a4-cb43-4dec-85e4-d89ec974efb2_1776961767600.jpg




राज्याच्या पुरवठा मंत्र्यांनी रेशन दुकानांमार्फत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा होऊनही अद्याप ग्रामीण भागात, विशेषतः घाटलाडकी येथे केरोसीनचा पुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता केरोसीनसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जागतिक परिस्थितीमुळे देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी येत असून, बुकिंगनंतरही वेळेवर सिलिंडर मिळेल याची खात्री नाही. या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊ नये म्हणून, राज्याच्या पुरवठा विभागाने रेशन दुकानांतून केरोसीन पुरवण्याची घोषणा केली होती. परंतु, ही योजना अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटलाडकी येथे केरोसीनचा साठा अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे शासनाने केलेली घोषणा केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात अंमलात येईल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून, याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. शासनाने महिलांना चुलीपासून मुक्त करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. या संदर्भात चांदुर बाजारचे पुरवठा अधिकारी राहुल केदारे यांनी माहिती दिली की, जिल्ह्याला केरोसीनचा पुरवठा अद्याप झालेला नाही, त्यामुळे तालुक्यातही ते पोहोचले नाही. या महिन्याच्या अखेरीस पुरवठा होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर रेशन दुकानांमध्ये केरोसीन उपलब्ध होईल. नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed