कचरा संकलनासाठी शुल्क विरोधात उबाठाचे आंदोलन:ठराव विखंडन करण्याची केली मागणी‎

0
240_177687022269e8e34eb8a6f_24.jpg




महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा अकोलेकरांवर ६०० रुपयांचा आर्थिक भार लादल्याचा आरोप करत मालमत्ता करामध्ये समाविष्ट करण्यात आलेले कचरा संकलनाचे ६०० रुपये शुल्क तत्काळ करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख आशिष गावंडे यांनी केली. भाजपने सभागृहात मंजूर केलेला ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे करण्यात आली. यापूर्वी सन २०१७ मध्ये मनपा प्रशासनाने मालमत्ता करात मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली होती. त्या वाढीचा आर्थिक फटका शहरवासी अद्यापही सहन करत असताना आता पुन्हा कचरा संकलनाच्या नावाखाली ६०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क लादणे म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि झोपडपट्टी भागातील गरीब कुटुंबांची आर्थिक पिळवणूकच असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. मनपा सभेत केलेला ठराव तातडीने विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, शहरप्रमुख राहुल कराळे, मनपा गटनेता विजय इंगळे, नगरसेवक अभय खुमकर, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर संघटक अनिल परचुरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे आदी उपस्थित होते. …तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर कायदेशीर लढा उभारण्यासोबतच जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात भाजपच्या मनमानी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed