आरोग्य जनजागृती मोहिमेला वेग; एचपीव्ही लसीकरणास प्रतिसाद:28,376 लसीकरणाचे उद्दिष्ट, दीड महिन्यात 1,288 मुलींना दिली लस‎

0
transfar_240_177685318669e8a0c233914_hpclas.jpg




जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण, टीबीमुक्त भारत अभियान (टप्पा २), तापमानामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव, ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान तसेच पॅलिएटिव्ह केअर सेवा देण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा, गटसभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध स्पर्धा व उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला देखील जिल्हाभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य विषयक लसीकरण पूर्ण करण्यासाठी मदत होईल असा विश्वास देखील या निमित्ताने आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जात आहे. यावेळी नितीन थुटे, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमाला सहकार्य केले. या सर्वसमावेशक जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक बदल होत आहेत. विशेषतः एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्रतिसाद वाढत आहे. विद्यार्थी, शिक्षकांना दिले आरोग्य शिक्षणः या मोहिमेचा एक भाग म्हणून पातूर तालुक्यातील माळ राजुरा येथील सुधाकरराव नाईक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ८ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षे अपूर्ण असलेल्या मुलींना समाविष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या वयोगटातील २८,३७६ मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ८,०५९ मुली ग्रामीण तर २०,३१७ मुली शहरी भागातील आहेत. आतापर्यंत १,२८८ मुलींना लस देण्यात आली असून, पुढील काळात हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed