साधनेला वैराग्याची झालर आवश्यक ती भाग्याची प्रतीक- संजय महाराज:श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दीनिमित्त अंत्री मलकापूरला आयोजन
![]()
समस्त संतांनी वैराग्याला भाग्याचे प्रतीक मानले आहे. वैराग्य हे भाग्यशाली व्यक्तीलाच प्राप्त होते, असे तुकोबाराय म्हणत. कारण कोणत्याही साधनेचा मुख्य पाया वैराग्यच आहे. साधना कोणतीही करा. कशाचीही करा. त्याला वैराग्याच्या झालरची आवश्यकता असते. तरच त्या साधनेचे आपण अधिपती होऊ शकू. संप्रदायातील सर्वात मोठी तपश्चर्या वैराग्य आहे. म्हणून संतांसाठी वैराग्य हे भाग्याचे परिचायक आहे. ते संतसंगतीमुळे प्राप्त होते. म्हणून संतांची संगत करा. वैराग्यशील व्हा, भाग्य प्राप्त करा. असा हितोपदेश संजय महाराज पाचपोर यांनी केला. ते वै. श्रीगुरू श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात बोलत होते. निंबा फाटा परिसरातील अंत्री मलकापूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात रामायणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांनी कीर्तनाचे पंचम पुष्प सादर केले. “वैराग्याचें भाग्य, संतसंग हाची लाग, संतकृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप, ज्याचे चित्तीं वैराग्य, त्याचें भाग्य निश्चय जाग, त्यासी संतांची कृपाती, मिळे निर्मळ भक्तिमार्ग, भेदभाव नाहीं तेथ, ज्या संतांचे चरण धरते साधक निष्पाप जाहले, देवभक्त म्हणती जन सार’, या तुकोबारायांच्या वैराग्यसंदर्भातील अभंगावर त्यांनी मार्मिक निरूपण केले. ते म्हणाले की, संतांच्या संगतीमुळे भक्तामध्ये वैराग्य निर्माण होते. बंकट स्वामींच्या माध्यमातून श्रीराम महाराजांना वैराग्य प्राप्त झाले. ज्याप्रमाणे बोर, बाभळी चंदनाच्या आश्रयाला गेल्यावर त्यांना चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. मात्र हा सुगंध केळीला प्राप्त होत नाही. कारण केळीमध्ये निरनिराळे पापुद्रे असतात. त्याचप्रमाणे माणसाचेही आहे. निरनिराळ्या अवगुणांचे पापुद्रे धारण करणाऱ्या व्यक्तीला वैराग्य प्राप्त होत नाही. अहंकाराच्या पापुद्राने वैराग्य प्राप्त होत नाही. मात्र संतांच्या संगतीनेच वैराग्य प्राप्त होते. कारण तेथे कोणत्याही अहंकाराला थारा नाही. म्हणून संतांच्या संगतीत राहिल्याने तुमचे जीवन सुगंधित होईल. या सुगंधामुळे वैराग्य निर्माण होईल. हे वैराग्य भाग्यात परावर्तित होईल. संतांची वैराग्यसंदर्भातील भाग्याची कल्पना वेगळी आहे. प्रापंचिक व्यक्तीची भाग्याची व्याख्या निराळी आहे, असे संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले. वैभव, धन, संपत्ती याला सामान्य माणूस भाग्य समजतो, असे संजय महाराज पाचपोर यांनी म्हणाले. मात्र संतविश्व अशा बाबींना भाग्य समजत नाही. वैराग्याच्या मार्गातील ही व्यवस्था अडथळा मानली जाते. म्हणून संतसंगतीचा मार्ग अनुसरून जीवन कृतार्थ करण्याचे आवाहन संजय महाराज पाचपोर यांनी यावेळी केले. संजय महाराज पाचपोर यांनी वै. श्रीराम महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, श्रीराम महाराजांनी ज्ञानेश्वरी पाठ केली. ९ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी पाठ करणे हा त्या काळातील विक्रम होता, असे त्यांनी सांगितले. महाराजांना ज्ञानेश्वरी प्राणप्रिय होती. ज्ञानोबारायांचे अंतःकरण बघायचे असेल तर पसायदान वाचा. तरच ज्ञानोबारायांचे अंतर्मन आपल्याला कळू शकेल. ते म्हणाले, परमार्थिक कार्यात क्रांती करणे सोपी बाब नाही. आपण पदाची क्रांती करू शकतो. पैशाची क्रांती करू शकतो. धनाची क्रांती करू शकतो. ही बाब या व्यवस्थेत अगदी शुल्लक आहे. सोपी आहे. आज धनाचे प्राबल्य फार मोठे आहे. आजही माणसाचे नाव येत नाही. पैशाचे नाव पुढे येते. आज समाजात व्यक्तीचा परिचय होत नाही. त्याच्या धनाचा परिचय होतो. मात्र पारमार्थिक मार्गात अशा बाबी शुल्लक आहेत. गौण आहेत. बिकट परिस्थितीत वयाच्या २४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी मुखपाठ करून राज्यात शंभर कीर्तनकार निर्माण करणे सोपी बाब नाही. ही वै. श्रीराम महाराजांचीच किमया होती. अशा त्यांच्या शताब्दी महोत्सवाच्या कीर्तनरूपी सेवेत आपल्याला कीर्तनाचा मान मिळाला. ही भाग्याची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
