रिक्षा चालकांना मराठी सक्तीवरून शिंदे गटातच ठिणगी:संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

0
db-temp-cover-marathi-2026-04-23t202945185_1776956358.jpg




राज्यातील टॅक्सी, रिक्षा तसेच ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीतच संवाद साधणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवत फेरविचाराचे पत्र प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे. २०१९ मध्येच रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अनेक अमराठी चालक मराठीत बोलत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि तज्ज्ञांच्या मदतीने अमराठी चालकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण अभ्यासक्रमही तयार केला जाणार आहे. एकीकडे मंत्री प्रताप सरनाईक निर्णयावर ठाम असताना, त्यांच्याच पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी याला विरोध केला आहे. निरुपम यांनी सरनाईक यांना पत्र लिहून या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली आहे. संजय निरुपम यांचे पत्र जशास तसे… संजय निरुपम पत्रात लिहितात, आपणास ही विनम्र परंतु ठाम विनंती करीत आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे, पासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा घेतलेला निर्णय अनेक कष्टकरी चालकांच्या मनात भीती, संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा ठरत आहे. मराठी भाषेचा सन्मान, तिचा अभिमान आणि तिचं जतन हे आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेलं आहे, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र, भाषेच्या प्रेमाला सक्तीची चौकट घालणे आणि त्यासाठी परीक्षा लादणे, हे हजारो कष्टकरी चालकांच्या जगण्यावर आघात करणारे ठरू शकते, ही बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे. मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक महानगरात सुमारे ७० टक्क्यांहून अधिक रिक्षा व टॅक्सी चालक हे हे। गुजरात, उत्तर भारत, पंजाब तसेच दक्षिण भारतातील विविध भागांतून येथे आलेले आहेत. त्यांनी आपल्या कष्टाने या शहरात स्थान निर्माण केले आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामाणिकपणे चालवला आहे आणि मुंबईच्या गतिमान जीवनशैलीला चालना दिली आहे. अशा वेळी या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण होत आहे. त्यांच्या मनात भीती आणि असंतोष वाढत आहे. आणि मुंबईच्या दैनंदिन वाहतूक व्यवस्थेलाही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. माझ्याकडे अनेक चालकांचे फोन येत असून, त्यांच्या व्यथा ऐकताना मन अक्षरशः हेलावून जाते, त्यांच्या डोळ्यातील असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची चिंता ही अत्यंत वेदनादायी आहे. याकरिता माझी आपणास विनंती आहे की, मराठी भाषेचा सन्मान अबाधित ठेवत. तुटक, कामचलाऊ मराठी समजणाऱ्या व बोलणाऱ्या चालकांना सवलत देण्यात यावी आणि भाषा ज्ञानाची सक्ती व परीक्षा घेण्याचा निर्णय पुनर्विचार करून मागे घ्यावा. प्रेमाने शिकवलेली भाषा हृदयात घर करते, पण सक्तीने लादलेली भाषा मनात भीती निर्माण करते. आपण या विषयाकडे सहानुभूतीने, मानवतेच्या दृष्टीने आणि दूरदृष्टीने पाहून योग्य तो निर्णय घ्याल, असा माझा ठाम विश्वास आहे. आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed