नगरसेवकाला खंडणी मागणाऱ्या युटूबर पत्रकार शेख याहियाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्यात दाखल नगरसेवकाला खंडणी मागण्याच्या गुन्ह्यातील अटक पूर्व जामीन अर्जावर नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाधीस एस.डी. तावशीकर यांनी युटूबर पत्रकार शेख याहियाचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 308(2) व 3(5) प्रमाणे 30 मार्च 2026 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात शेख याहिया शेख इसाक (45, पत्रकार), शेख अझहर शेख याहिया (20) व शेख बशीर शेख रशीद (43) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक प्रवीण आगलावे यांच्या कडे आहे. त्यानंतर आरोपींकडून अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
जामीन अर्जावर 17 एप्रिल रोजी सुनावणी पार पडली. आरोपींच्या वतीने अॅड. शेख आमेर यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला, तर राज्याच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मोहम्मद अब्बास यांनी जामीनास विरोध दर्शवित आपली बाजू मांडली.
या प्रकरणात शेख याहियाने सर्वसामान्य नागरिकांवर प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरसेवका कडून एक लाखांची खंडणी मागणी गंभीर प्रकार असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. त्यासाठी पोलीस कोठडीतील तपास अत्यंत आवश्यक असल्याचे निकालात म्हंटले आहे. म्हणून शेख याहियाचा अटक पूर्व जामीन अर्ज न्या.तावशीकर यांनी फेटाळून लावला आहे.पण शेख अझहर शेख याहिया (20) व शेख बशीर शेख रशीद (43) या दोघांना अटक पूर्व जामीन मंजूर करतांना दिनांक २४ एप्रिल २०२६ ते १५ मे २०२६ दरम्यान पोलीस ठाणे इतवारा येथे प्रत्येक सोमवारी तीन तासांची हजेरी लावली आहे.सोबत अनेक अटी जोडल्या आहेत. अटींचे उल्लंघन झाले तर देण्यात आलेला अटक पूर्व जामीन रद्द होईल असे सुद्धा लिहिलेले आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने 21 एप्रिल रोजी आदेश जाहीर केला. प्रकरणाचा सविस्तर आदेश न्यायालयीन अभिलेखात नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.
