'दगडूशेठ'च्या मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण:तपासणी, औषधे, श्रवणयंत्र व कृत्रिम अवयव मोफत मिळणार

0
dcc0aadb-2703-44ef-9230-ca0c09bcf54a_1776769997390.jpg




श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने सारसबागेजवळील हिराबाग कोठी परिसरात मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण केले आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या ब्रीदानुसार उभारलेल्या या केंद्रात रुग्णांना विविध प्रकारच्या तपासण्या, औषधे, श्रवणयंत्रे आणि कृत्रिम अवयव मोफत मिळणार आहेत. राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाढ यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, आयएमएचे डॉ. विरेंद्र ओस्तवाल, डॉ. अमरीश दरक, डॉ. संदेश पटवर्धन, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. विजय कंदेवाढ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सध्या आरोग्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. ट्रस्टने उभारलेल्या या मोफत आरोग्य केंद्राचा लाभ गरीब आणि गरजू जनतेला होईल. मोबाईल आरोग्य व्हॅनची संकल्पना उत्तम असून, दुर्गम व ग्रामीण भागांत दात, डोळे आणि कानाची तपासणी करून आरोग्य सेवा देता येणार आहे. आमदार हेमंत रासने यांनी नमूद केले की, ‘जय गणेश रुग्णसेवा अभियाना’च्या माध्यमातून हजारो रुग्णांना दिलासा मिळत आहे. शासकीय व धर्मादाय यंत्रणांनी ट्रस्टला यात मोठे सहकार्य केले आहे. पुणे शहर आणि महाराष्ट्र राज्य निरोगी राहावे, हा यामागील मुख्य उद्देश असून, सर्वांना तत्परतेने आरोग्यसेवा मिळतील, असा प्रयत्न केला जाईल. हे मोफत आरोग्य सेवा केंद्र सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ या वेळेत खुले राहणार आहे. येथे विविध रक्त तपासण्या, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल ओपीडी, हृदय ईसीजी, दंत तपासणी, दात काढणे, लहान मुलांसाठी लसीकरण सुविधा, कृत्रिम हात व पाय वाटप नोंदणी आणि श्रवण तपासणी यांसारख्या सेवा उपलब्ध असतील. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असेल. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ९८८१५१६५१७ किंवा ९९२३५१६५१७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी रुग्णांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks