डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:मनीषा माने-मुसळेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला;आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार
![]()
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला. या निकालामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणात नवे वळण आले असून आता पुढील लढाई उच्च न्यायालयात लढण्याची तयारी सुरू झाली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री स्वतःवर गोळी झाडून टोकाचे पाऊल उचलले होते. त्याआधी त्यांनी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. या चिट्ठीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपीने आपण निरपराध असल्याचा दावा करत न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मनीषा माने-मुसळे हिने या गुन्ह्यात आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत न्यायालयाकडे दिलासा मागितला होता. मात्र, सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने हा अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिच्यावर चालणारी कायदेशीर प्रक्रिया कायम राहणार आहे. या निर्णयाविरोधात आता उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिचे वकील अॅड. प्रशांत नवगिरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचा घटनाक्रमही या प्रकरणात महत्त्वाचा ठरतो. 18 एप्रिलच्या रात्री ते आपल्या रुग्णालयात रुग्णांची तपासणी करून घरी परतले होते. सुमारे 8.30 वाजता त्यांच्या बेडरूममधील बाथरूममधून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर पुन्हा एकदा आवाज आल्याने कुटुंबीयांनी धाव घेतली असता ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरसह राज्यात अत्यंत नामांकित न्युरोफिजिशियन म्हणून ओळखले जात होते. वयाच्या 69 व्या वर्षीपर्यंत त्यांनी स्वतः उभारलेल्या ‘एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस’ या अत्याधुनिक रुग्णालयातून हजारो रुग्णांना उपचार दिले होते. त्यांनी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून शिक्षण पूर्ण करून नंतर डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमडी पदवी घेतली. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एमआरसीपी ही पदवीही त्यांनी संपादन केली होती. देश-विदेशात त्यांनी संशोधन सादर केले असून त्यांच्या कार्याचा मोठा ठसा वैद्यकीय क्षेत्रावर उमटला आहे. कायदेशीर लढाई तीव्र होण्याची चिन्हे या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूरमध्ये मोठी चर्चा सुरू असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील सुनावणीत काय घडते, तसेच उच्च न्यायालयात कोणता निर्णय येतो, यावर या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र आरोपीला दिलासा न मिळाल्याने कायदेशीर लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
