अशोक खरातचा नवा घोटाळा उघड:32 बनावट खात्यांतून 57 लाखांची अफरातफर; भोंदूगिरीतून खरातचा आणखी एक मोठा पर्दाफाश
![]()
नाशिक जिल्ह्यात स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आधीच विविध गंभीर आरोपांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत एका व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून 32 बनावट खाती उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे. या खात्यांच्या माध्यमातून सुमारे 57 लाख 90 हजार 979 रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलिसांनी नवीन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा कालावधी 2016 ते 2023 असा असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदाराच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावावर ही खाती उघडण्यात आली होती. संबंधित खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले आणि त्यातून मोठी रक्कम वळवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या प्रकारामुळे पतसंस्थेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यवस्थापनाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पोलिसांनी अशोक खरातसह संबंधित व्यवस्थापनावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) लक्ष घातले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने जगदंबा पतसंस्थेवर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे पुरावे मिळाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवत तपासाचा फास आणखी आवळला आहे. त्यामुळे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर केंद्रीय यंत्रणाही या प्रकरणात सक्रिय झाल्या आहेत. अशोक खरातवर याआधीही महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप आहेत. या आरोपांमुळे तो आधीच कायद्याच्या कचाट्यात सापडलेला असताना आता आर्थिक गैरव्यवहाराच्या नव्या प्रकरणामुळे त्याच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. भाविकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेत आर्थिक साम्राज्य उभे केल्याचा आरोपही यावेळी पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा एकत्रित तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने 19 एप्रिल रोजी खरातला न्यायालयात हजर केले होते. या वेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता एकामागून एक गुन्हे समोर येत असल्यामुळे अशोक खरातभोवतीचे जाळे अधिकच घट्ट होत चालले आहे. आर्थिक फसवणूक, महिलांवरील अत्याचार आणि इतर गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. पुढील तपासात नेमके किती लोक या घोटाळ्यात सहभागी आहेत आणि किती रक्कम वळवण्यात आली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस आणि तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
