समर्थनगर चालवणार संभाजीनगर:महापौर, सभापतीनंतर आता दोन स्वीकृत सदस्यपदे, भाजपचे 5, एमआयएमचे 3, तर शिवसेना (ठाकरे) व शिंदे गटाच्या प्रत्येकी एकाला संधी
![]()
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (20 एप्रिल) 10 स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार निश्चित झालेल्या कोट्यानुसार गटनेत्यांनी दिलेल्या बंद लिफाफ्यातील नावांची अधिकृत घोषणा महापौर समीर राजूरकर यांनी केली. राजपत्रात (गॅझेट) नावे प्रसिद्ध झाल्यानंतर या सर्व नवनियुक्त सदस्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. नियुक्ती झाल्यानंतर मनपाच्या बाहेर डीजे आणि ढोल-ताशाच्या आवाजात जल्लोष साजरा करण्यात आला. ऐनवेळी नावात बदल केल्याचा आरोप करत विनोद बनकर यांनी क्रांती चौकात राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. महापालिकेत एकूण 115 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडून आलेल्या सदस्यांच्या तुलनात्मक संख्याबळानुसार 10 सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त करण्याची कायदेशीर तरतूद आहे. यासाठी नगरसचिव विभागाने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. या प्रक्रियेत एकूण 80 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले होते. अर्जांच्या छाननीअंती 52 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर पक्षनिहाय गटनेत्यांकडून बंद लिफाफ्यातून नावे मागवण्यात आली होती. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्धवसेना : अनेकांनी पक्ष सोडला, शिंदे एकवचनी प्रदीप (हनुमान) शिंदे हे युवा सेनेचे जिल्हाधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्याबरोबरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र, हनुमान यांनी पक्षात राहूनच काम सुरू ठेवले. मनपा निवडणुकीतही त्यांनी स्थानिक उमेदवारांचा प्रचार केला. त्याचेच फळ त्यांना मिळाले. पक्षात गटबाजी असतानाही चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे या दोघांचेही शिंदे यांच्या नावावर एकमत झाले. यासाठी मातोश्रीवरूनही निरोप आला होता. शिवसेना : युवासेनेवरची पक्षनिष्ठा शुभमच्या पदरी छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीने 13 जणांनी स्वीकृत नगरसेवकासाठी फॉर्म भरले होते. त्यापैकी दहा जणांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे पक्षाने निवडणूक लढवलेल्यांना संधी द्यायची नाही. असे धोरण ठरवले होते. त्यामुळे दहा जणांचा पत्ता कट झाला. उरलेल्या तिघांपैकी इतर ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 27 मध्ये शिवसेनेचा नगरसेवक नव्हता. त्यामुळे या भागात शिवसेनेचे संघटन वाढवण्यासाठी शुभम काळे यांना संधी देण्यात आली आहे. एमआयएम : वॉर्डांवर लक्ष, निवडीचा केला जल्लोष 3 जागा मिळाल्याने एमआयएमने आपली सदस्यसंख्या वाढवली आहे. सभागृहातील ताकदही टिकवून ठेवली असून त्यांनी प्रामुख्याने आपल्या प्रभावक्षेत्रातील तरुण, आक्रमक चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात वॉर्डातील विकासकामांच्या मुद्द्यांवर ते प्रशासनाला अधिक तीव्रतेने जाब विचारतील. विशेष म्हणजे नावांबाबत कोणतेही आढेवेढे न घेता नावे काही दिवसांपूर्वीच उघड झाली होती. शिक्कामोर्तब होताच सोमवारी निवडीचा एमआयएमकडून जल्लोष झाला. भाजप : भाजपच्या वाट्याला आले पाच स्वीकृत सदस्य माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे पुत्र हर्षवर्धन कराड व भाजपच्या माजी महिला आघाडी प्रमुख अमृता पालोदकर यांना स्वीकृत सदस्य केले. इतर सदस्यांमध्ये गोकुळसिंग मलके, छाया राजू खाजेकर व विजयसिंग झाला यांचा समावेश आहे. स्वीकृत सदस्य भाजपच्या वाट्याला पाच आले आहेत. भाजपने कंजारभाट, ब्राह्मण, राजपूत, मातंग आणि वंजारी या ओबीसी, मायक्रो ओबीसी, अनुसूचित जाती व खुल्या प्रवर्गातील सदस्यांना प्राधान्य या माध्यमातून दिल्याचे दिसते. मतदान प्रक्रियेत घेता येत नाही सहभाग स्वीकृत नगरसेवकांना मनपाच्या सर्वसाधारण सभा आणि ज्या समित्यांवर त्यांची नियुक्ती झाली आहे, त्या बैठकांना उपस्थित राहण्याचा पूर्ण अधिकार असतो. शहरातील प्रश्न, विकासकामे आणि प्रशासकीय प्रस्तावांवर ते सभागृहात आपले मत मांडू शकतात. सभागृहात एखादा ठराव मंजूर करताना बहुमतासाठी मतदान घेण्याची वेळ आल्यास स्वीकृत नगरसेवकांना त्यात मतदान करता येत नाही. नवनियुक्त नगरसेवक भाजप (5) : हर्षवर्धन कराड, छाया खाजेकर, गोकुळसिंग मलके, विजयसिंग झाला, अमृता पालोदकर. एमआयएम (3) : कुणाल खरात, शेख अहेमद शेख इलियास, मोहम्मद असरार मोहम्मद अकबर. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (1) : प्रदीप ऊर्फ हनुमान दिनकरराव शिंदे शिवसेना शिंदे गट (1) : शुभम काळे. इच्छुकांचा झाला हिरमोड भाजपचे मंगलमूर्ती शास्त्री, दीपक ढाकणे, राजेश मेहता आदी नेत्यांसह अनेकांचा हिरमोड झाला. मंत्री अतुल सावे व माजी खा. डॉ. भागवत कराड, राजू शिंदे यांचे यादीवर वर्चस्व राहिले. आ. संजय केणेकर यांच्या समर्थकाचा विचार झाला नसल्याची चर्चा होती. भाजपच्या मीरा चव्हाण नाराज भाजपने फुलंब्रीच्या आ. अनुराधा चव्हाण व बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनी सुचवलेले एकमेव नाव मीरा चव्हाण यांचा विचार केला नाही. मीरा चव्हाण यांनी सकाळी यादी आल्यानंतर आ. चव्हाण यांचे निवासस्थान गाठत नाराजी व्यक्त केली.
