संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा:पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका येणार, कोथळी येथील मंदिरात 4 ते 14 मे दरम्यान आयोजन‎

0
246_177667934469e5f9b0ac6a3_app_177665967469e5acda6df00_fb_img_1776659630352.jpg




जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी येथील समाधिस्थळी आदिशक्ती संत मुक्ताई यांचा ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त ४ ते १४ मे २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतील. वैशाख कृष्ण तृतीयेपासून सुरू होणारा हा सोहळा वैशाख कृष्ण द्वादशीपर्यंत चालेल. या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पादुकांचे आगमन होणार आहे. सुमारे ७२९ वर्षांपूर्वी विजांच्या कडकडाटात आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान घेत स्व-स्वरूपात लीन झाल्याची धार्मिक परंपरा सांगितली जाते. त्यावेळी सर्व संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ तसेच समकालीन संत उपस्थित असल्याचे मानले जाते. याच पवित्र स्थळी मुख्य अंतर्धान सोहळा १२ मे २०२६ रोजी साजरा होईल. त्यासाठी पंढरपूर येथून संत नामदेव महाराज व भगवान पांडुरंगाच्या पादुका पालखी, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी, सासवड येथून संत सोपानकाका पादुका सोहळा, कौंडण्यपूर येथून माता रुख्मिणी पादुका सोहळ्यांचे आगमन होईल. आळंदी व देहू येथील संत संस्थानांचे प्रतिनिधी, संत-महंतांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होईल. या निमित्त वै. पंढरीनाथ महाराज मानकर यांच्या प्रेरणेने आणि वै. प्रल्हाद महाराज सुळेकर यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचे व्यासपीठ नेतृत्व संदीप महाराज खामणीकर करतील. सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे, व्यवस्थापक उद्धव जुनारे यांनी केले आहे. १२ मे रोजी सायंकाळी ग्राम प्रदक्षिणा, दिंडी सोहळा १२ मे रोजी सकाळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पांडुरंग-रुख्मिणी तसेच संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे जुने मंदिरात आगमन होईल. सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत केशवदास नामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समाधी सोहळा, पुष्पवृष्टी (गुलाल) कीर्तन व आरती होईल. सायंकाळी ६ ते ७ नगरप्रदक्षिणा दिंडी सोहळा होणार आहे, असे आयोजकांनी सांगितले. १३ मे रोजी पांडुरंग पालखी मिरवणूक निघणार १३ मे रोजी एकादशीनिमित्त सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान जुने मुक्ताई मंदिर ते नवीन मंदिर मार्गावर श्री पांडुरंग पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात येईल. त्यात परिसरातील वारकरी, टाळकरी व भजनी मंडळे सहभागी होतील. तसेच पारायणासाठी येणाऱ्या भाविकांनी ३ मे रोजी सायंकाळपर्यंत आवश्यक साहित्यांसह उपस्थित राहावे. याशिवाय आषाढी वारीसाठी मुक्ताई पालखी सोहळ्याचे २४ जूनला प्रस्थान होईल.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks