निवृत्त सहायक आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक:पत्नी, मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
1130b609-1753-4594-b769-d93c54a17130_1776609295282.jpg




पुण्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघे रा. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना), दत्ता केदारी (रा. बोरज) आणि बाळासाहेब वाळुंज (रा. कामशेत, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजित विलास उंद्रे (वय ३५, रा. मांजरी खुर्द) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहायक पोलीस आयुक्त पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सहायक आयुक्तांनी २०२६ मध्ये खेड तालुक्यातील बोरज येथे मुंबईतील एका व्यावसायिकाची १२ एकर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले. ही जमीन खरेदी केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष त्यांनी दाखवले. त्यानंतर सहायक आयुक्तांनी मुंबईतील व्यावसायिकाच्या नावाने एका बँकेत खाते उघडले आणि तक्रारदाराकडून ५० लाख रुपये घेतले. तसेच, सोलापूर येथील एका बँकेत खासगी कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून आरटीजीएसद्वारे २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी व्यावसायिकाकडून आणखी पैसे घेण्यात आले. खरेदीखत करायचे असल्याचे सांगून सहायक आयुक्ताने तक्रारदार व्यावसायिकाकडून १ कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. खेडमधील जमीन मुंबईतील व्यावसायिकाची होती, मात्र तो हयात असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. जेव्हा तक्रारदार व्यावसायिकाने पैसे परत मागितले, तेव्हा सहायक आयुक्तांनी टाळाटाळ केली आणि त्यांना धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपासात असे उघड झाले आहे की, सहायक आयुक्तांनी काही रक्कम पत्नी आणि मुलाच्या खात्यात जमा केली होती. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या इतर दोघांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks