सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का?:विजय वडेट्टीवार यांचा सवाल; मोदींचे भाषण आचारसंहितेचे भंग करणारे असल्याचा आरोप
![]()
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला. भाजपने जे विधेयक आणले त्यात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. मनुस्मृती मानणाऱ्या भाजपत महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते, असे ते म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा एखाद्या महिलेच्या हातात देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी संघाला केला. विजय वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मोदींनी 50 हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे भाषण राजकीय प्रचारासारखे होते. त्यांनी आचारसंहितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान व पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा दिल्या आहेत. काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते? सत्ता कायम आपल्या हाती ठेवण्याचा हा भाजपचा कुटिल डाव होता. तो विरोधकांनी हाणून पाडला, असे वडेट्टीवार म्हणाले. भाजपच्या विधेयकात एससी, एसटीसाठी काहीच नव्हते भाजपने आणलेल्या विधेयकात अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. 33 टक्के आरक्षण देताना बहुजन समाजातील महिलांचा हक्क डावलून केवळ आपल्या मर्जीतील लोकांना सत्तेत बसवण्याचे ते षडयंत्र होते. मनुस्मृतीचा विचार मानणारी भाजप महिलांना आपल्या संघटनेत केवळ दुय्यम स्थान देते. ते संघाच्या प्रमुखपदी एखाद्या महिलेला नियुक्त करण्याचे धाडस दाखवणार का? भाजपचा देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचा डाव होता. तो असफल ठरला, असेही विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले. सर्वच उद्योग गौतम अदानींच्या घशात विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्योग गौतम अदानींच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप केला. देशातील रेल्वे, विमानतळ, वीज, सिमेंट, स्टील प्रकल्प हे सर्व नियम धाब्यावर बसवून अदानींच्या घशात घातले जात आहेत. देशातील जनता गरीब होत आहे. याऊलट अदानी श्रीमंत होत आहेत. भाजप व अदानी एकमेकांना पुरक आहेत. ते देशाची लुट करत आहेत, असे ते म्हणाले. महिलांना भाजपचा कावा समजेल हा विश्वास भाजप पुरस्कृत भोंदूबाबा व धर्मांध शक्ती देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महिलांच्या नावाखाली स्वतःची सत्ता वाचवण्याचे प्रयत्न देशातील जागरूक महिलांना नक्कीच समजतील असा आम्हाला विश्वास आहे. अत्याचार व शोषणाच्या घटनेत जात-धर्म शोधणे घृणास्पद आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवनीत राणा व डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारे डॉक्टर अनिल बोंडे यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले पाहिजे, असेही वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.
