महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वर्षातून 4 वेळा ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा:शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, शिक्षक संघटनांची नाराजी

[ads1]


राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांचा सहभाग वाढवणे, शाळा आणि पालकांमध्ये नियमित संवाद निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही घटकांमध्ये समन्वय वाढवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षण आयुक्तालयाने 27 ऑगस्ट रोजी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील शाळांमध्ये हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षात चार वेळा हा मेळावा घेण्यात येईल. जुलै, ऑक्टोबर, जानेवारी आणि एप्रिल या महिन्यांच्या पहिल्या शनिवारी शक्यतो शाळास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा निर्णय राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांना लागू आहे. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवरील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मेळाव्याच्या आयोजनाची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे. माता-पालकांशी थेट संवाद शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, हा मेळावा केवळ नियमित किंवा औपचारिक पालकसभा म्हणून आयोजित करण्यात येऊ नये. माता-पालकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणे, शैक्षणिक जागृती निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू असणार आहे. विद्यार्थ्याची शाळेतील प्रगती नेमकी कशी आहे, त्याला कोणत्या विषयात अडचणी येतात, घरी अभ्यासासाठी योग्य वातावरण आहे का, त्याची वाचनाची सवय कशी आहे, शाळेतील उपस्थिती कशी आहे आणि त्याच्या वर्तनात काही बदल जाणवत आहेत का, याबाबत शिक्षक पालकांशी चर्चा करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष लक्ष मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना दिली जाणार आहे. मूल्यमापनाची पद्धत, परीक्षा वेळापत्रक, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी तसेच वाचनाची सवय विकसित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या घरातील अभ्यासाचे वातावरणही या चर्चेचा भाग असेल. मुलांना नियमित अभ्यासासाठी वेळ मिळतो का, त्यांना वाचनासाठी प्रोत्साहन दिले जाते का आणि पालक घरच्या घरी त्यांच्या अभ्यासात कशा पद्धतीने मदत करू शकतात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती हा देखील मेळाव्यातील महत्त्वाचा विषय असणार आहे. विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीमागील कारणे जाणून घेणे, त्यांना नियमित शाळेत आणण्यासाठी पालकांचे सहकार्य मिळवणे आणि विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याची प्रवृत्ती रोखणे, यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षक आणि पालकांमध्ये नियमित संवाद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल किंवा अध्ययनातील अडचणी वेळेत लक्षात येतील आणि त्यावर योग्य उपाययोजना करता येतील, असा शिक्षण विभागाचा उद्देश आहे. आरोग्य, पोषण आणि बालसुरक्षेचीही माहिती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणाकडेही लक्ष देण्यात येणार आहे. स्वच्छता, पौष्टिक आहार, आरोग्याची काळजी, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, बालहक्क आणि बालसंरक्षण याबाबत पालकांना माहिती देण्यात येणार आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शाळेतील शिक्षण पुरेसे नसून घरातील वातावरण आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रक्रियेत पालकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. सरकारी योजनांची माहिती पालकांपर्यंत या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती पालकांना देण्यात येणार आहे. मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना तसेच शाळेतील इतर सुविधांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना आहेत. याशिवाय नवीन अभ्यासक्रम, त्यानुसार बदललेली पाठ्यपुस्तके, डिजिटल शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा आणि इतर महत्त्वाच्या उपक्रमांची माहितीही देण्यात येणार आहे. शाळेच्या उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग वाढवणार शाळेच्या वार्षिक नियोजनाची माहिती पालकांना देण्याबरोबरच स्नेहसंमेलन, सहली, विविध स्पर्धा, शैक्षणिक आणि इतर उपक्रमांमध्ये पालकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित उपक्रमांमध्ये माता-पालकांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित APAAR ID, UDISE+ आणि इतर शैक्षणिक नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहितीबाबतही पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानालाही जोड विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाला बळ देण्यासाठी ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानाशीही या उपक्रमाची सांगड घालण्यात आली आहे. वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाच्या मूलभूत कौशल्यांमध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पालकांनी घरच्या घरी मुलांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. शिक्षक संघटनांची नाराजी दरम्यान, शिक्षण विभागाच्या या निर्णयावर शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षकांवर आधीच विविध अशैक्षणिक कामांचा भार असल्याने आणखी एका अनिवार्य उपक्रमामुळे अध्यापनासाठी उपलब्ध वेळ कमी होण्याची चिंता शिक्षक प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. शिक्षक प्रतिनिधी गिरीश सामंत यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना पत्र लिहून या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. जनगणना, एसआयआर आणि इतर प्रशासकीय कामांमुळे शिक्षकांवर आधीच अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात जनगणनेचे काम आणि त्यानंतर जून ते ऑगस्टदरम्यान एसआयआरच्या कामामुळे शिक्षकांचा मोठा वेळ प्रशासकीय कामांमध्ये गेला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर होत असल्याचा दावा शिक्षक प्रतिनिधींनी केला आहे. पालक मेळाव्याची पद्धत शाळांनी ठरवावी दरम्यान, शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना माता-पालकांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मेळाव्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांचा एकत्रित अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असताना, दुसरीकडे शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे अध्यापनावर कितपत परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *