Pune Airport | पुणे विमानतळावर मोठा अपघात टळला; नेमकं काय घडलं?
Pune Airport | पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) शुक्रवारी रात्री एक गंभीर प्रसंग घडला, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) लढाऊ विमानाला लँडिंगदरम्यान अडचण निर्माण झाल्याने धावपट्टी बंद ठेवावी लागली. या घटनेमुळे नागरी उड्डाणांवर परिणाम झाला आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजून 25 मिनिटांनी हवाई दलाचे एक लढाऊ विमान पुणे विमानतळावर उतरतानाच त्याच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे विमानाला जोराचा धक्का बसला आणि तातडीने धावपट्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या घटनेत वैमानिक सुरक्षित राहिला असून कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले नाही.
या घटनेनंतर विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. धावपट्टीवरील अडथळे दूर करून पुन्हा उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी अंदाजे 4 ते 5 तास लागतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुणे विमानतळ हे दुहेरी वापराच्या पद्धतीवर चालत असल्यामुळे येथे नागरी आणि लष्करी दोन्ही उड्डाणे होतात, त्यामुळे या घटनेचा परिणाम अधिक व्यापक झाला.
Pune Airport | उड्डाणे रद्द, प्रवाशांचा खोळंबा:
धावपट्टी बंद झाल्यामुळे पुणे विमानतळावरील सर्व नागरी उड्डाणे काही काळासाठी थांबवण्यात आली. इंधन मर्यादा आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक विमानांना गुजरातमधील सुरत (Surat) आणि गोव्यातील मोपा (Mopa Airport) येथे वळवण्यात आले. यामुळे अनेक प्रवाशांना उशीर आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनेमुळे अनेक विमानसेवा रद्द कराव्या लागल्या. इंडिगो (IndiGo) कंपनीची एकूण 65 विमाने रद्द झाली, तर एअर इंडिया (Air India) आणि स्पाईसजेट (SpiceJet) यांच्या काही उड्डाणांवरही परिणाम झाला. तसेच एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) ची देखील 10 उड्डाणे रद्द करण्यात आली. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी या घटनेची पुष्टी करत सांगितले की, परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करत असून ते स्वतः अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
