'मटण नीट शिजले नाही' म्हणून पतीला आला राग:मित्रासमोरच वाट्टेल ते सुनावले; अपमान सहन न झाल्याने पत्नीने टोकाचे पाऊल उचलले
![]()
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका गृहिणीने किरकोळ कारणावरून आलेल्या रागातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘मटण नीट शिजले नाही’ या शुल्लक कारणावरून पतीशी झालेल्या वादाने चेतना मनोज जाधव या महिलेने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. एका हसत्याखेळत्या संसाराची या घटनेमुळे राखरांगोळी झाली असून, संतापाच्या भरात घेतलेल्या एका निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेच्या दिवशी पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. मटण व्यवस्थित शिजले नसल्याचे कारण पुढे करत मनोजने पाहुण्यासमोरच चेतनाचा अपमान करण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित न राहता, त्यात मनोजचा संशयी स्वभाव आणि व्यसनाचीही भर पडली. या सार्वजनिक अपमान आणि सततच्या जाचाला कंटाळून चेतनाने टोकाचे पाऊल उचलले. भरलेल्या ताटावरून उठली अन्… घटनेच्या दिवशी पाहुण्यांसमोरच झालेल्या अपमानामुळे चेतना भरल्या ताटावरून उठून आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन तिने ही बाब आपल्या पतीला सांगितली तेव्हा एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर चेतनाला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. चेतनाने यापूर्वी मनोजला केले होते माफ दरम्यान, मनोजला दारूचे व्यसन होते. यापूर्वी देखील 2015 साली त्याच्यावर कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. 2017 मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने मनोजला माफ केले होते. मात्र बुधवारी घडलेल्या घटनेतून झालेल्या अपमानाचा घाव चेतनाच्या जिव्हारी लागला आणि त्यातून तिने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल या दुर्दैवी घटनेप्रकरणी मृत चेतनाचे मामा मनोहर राठोड (रा. देवगाव) यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती, जिथे त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. सध्या पोलिस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असून, पोलिस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
