मेंदू आणि मणक्याच्या आधुनिक उपचारांसाठी डॉ. रवनीतसिंघ छाबडा दुसऱ्या रविवारी नांदेडमध्ये

लेझर उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि मेंदूतील गाठींवर विनाशस्त्रक्रिया उपचारांसह विविध आधुनिक सुविधांबाबत रुग्णांना मिळणार मार्गदर्शन

नांदेड : मेंदू आणि मणक्याच्या आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक उपचार पर्याय उपलब्ध झाले आहेत. काही आजारांमध्ये मोठी शस्त्रक्रिया न करताही लेझर, रेडिओफ्रिक्वेन्सी आणि दुर्बिणीद्वारे उपचार करणे शक्य होत आहे. या क्षेत्रातील अनुभवी मेंदू व मणक्याचे शल्यचिकित्सक डॉ. रवनीतसिंघ छाबडा हे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवार,रोजी नांदेडमध्ये रुग्णांना वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. सकाळी ९ ते ११ या वेळेत दशमेश हॉस्पिटल येथे त्यांचा रुग्णपरामर्श आयोजित करण्यात आला आहे.

शक्यतो शस्त्रक्रिया टाळून उपचार करण्यावर भर

मेंदू आणि मणक्याच्या प्रत्येक आजारात शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसते. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने औषधोपचार, कमी चिरफाड करून केले जाणारे उपचार आणि आवश्यकतेनुसार सूक्ष्म शस्त्रक्रियेला प्राधान्य दिले जाते. केवळ अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच मोठी शस्त्रक्रिया करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे प्रतिपादन हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल, सोमाजीगुडा येथे कार्यरत मेंदू व मणक्याचे शल्यचिकित्सक डॉ. रवनीतसिंघ छाबडा यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यशोदा हॉस्पिटलमध्ये मेंदू आणि मणक्याच्या विविध आजारांवर उपचार करताना दुर्बिणीद्वारे तसेच कमी चिरफाड करून केल्या जाणाऱ्या आधुनिक उपचार पद्धतींचा जास्तीत जास्त वापर केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

देश-विदेशातील प्रशिक्षणाचा अनुभव

डॉ. रवनीतसिंघ छाबडा यांनी अमृतसर येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथील एम्सच्या मेंदू शस्त्रक्रिया विभागात काम केले आहे. दिल्ली आणि दक्षिण कोरिया येथे दुर्बिणीद्वारे मणक्याच्या शस्त्रक्रियेचे, तर जर्मनी येथे आधुनिक रेडिओसर्जरीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. सध्या ते हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल, सोमाजीगुडा येथे रुग्णसेवा देत आहेत.

मणक्याच्या आजारांवर लेझर आणि दुर्बिणीद्वारे उपचार

कंबर आणि मानेतील डिस्कमुळे नसांवर येणारा दबाव कमी करण्यासाठी निवडक रुग्णांमध्ये लेझर आणि रेडिओफ्रिक्वेन्सी उपचारांचा उपयोग केला जातो. मानेच्या सांध्यांच्या वेदनांवरही रेडिओफ्रिक्वेन्सी उपचार करता येतात. डिस्कचा त्रास अधिक असल्यास शस्त्रक्रियेची गरज भासणाऱ्या रुग्णांमध्ये दोन छोट्या छेदांद्वारे दुर्बिणीच्या मदतीने डिस्कचा त्रासदायक भाग काढता येतो.

काही निवडक उपचारांमध्ये रुग्णाला पूर्ण बेशुद्ध न करता उपचार करणे आणि त्याच दिवशी घरी पाठवणे शक्य होते. अशा काही उपचारांसाठी उपाशीपोटी येण्याचीही गरज नसते. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांनी तपासणीसाठी येताना नेहमीप्रमाणे जेवण आणि औषधे घ्यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेंदूतील गाठींवर विनाशस्त्रक्रिया उपचार

मेंदूतील काही निवडक गाठींवर कोणताही छेद न घेता स्टीरिओटॅक्टिक रेडिओसर्जरीद्वारे उपचार करता येतात. गाठीचा प्रकार आणि आकार लक्षात घेऊन एक ते पाच दिवसांचे उपचार नियोजन केले जाते. यासाठी एमआरआयच्या मदतीने अचूक ठिकाणी किरणे पोहोचविणाऱ्या एमआर-लिनॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

मेंदूतील गाठ काढण्याची गरज असल्यास ब्रेन नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने गाठीपर्यंत पोहोचण्याचा अचूक मार्ग निश्चित केला जातो. त्यामुळे मेंदूच्या निरोगी भागांचे संरक्षण करण्यास मदत होते.

चेहऱ्याच्या तीव्र वेदना आणि स्नायूंच्या जकडणुकीवरही उपचार

चेहरा, गाल, जबडा किंवा दातांमध्ये विजेचा झटका बसल्यासारख्या तीव्र वेदना होणाऱ्या ट्रायजेमिनल न्युराल्जिया या आजारावर औषधोपचारांनी आराम न मिळाल्यास बारीक सुईच्या मदतीने रेडिओफ्रिक्वेन्सी उपचार करता येतात. गंभीर स्नायूंच्या जकडणुकीच्या रुग्णांसाठी औषध थेट मज्जारज्जूजवळ पोहोचविणाऱ्या बॅक्लोफेन पंपचाही उपचार पर्याय उपलब्ध आहे.

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत नसांच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी नर्व्ह मॉनिटरिंग, हाडे अचूकपणे कापण्यासाठी अल्ट्रासोनिक बोन स्कॅल्पेल आणि शस्त्रक्रियेचे मोठे त्रिमितीय दृश्य दाखविणाऱ्या थ्रीडी एक्सोस्कोपचा वापर केला जातो. मणक्यातील डिस्कची झीज आणि सांध्यांच्या वेदनांसाठी रुग्णाच्या स्वतःच्या रक्तापासून तयार केलेल्या पीआरपी इंजेक्शनचाही पर्याय उपलब्ध आहे.

याशिवाय मणक्याची शस्त्रक्रिया होऊनही कंबर किंवा पायातील वेदना कायम राहणे अथवा पुन्हा सुरू होणे, अशा फेल्ड बॅक सर्जरी सिंड्रोमच्या रुग्णांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. मेंदूशी संबंधित कारणांमुळे होणाऱ्या डोकेदुखीच्या रुग्णांनाही सल्ला घेता येणार आहे. यापूर्वी अन्य ठिकाणी शस्त्रक्रियेचा सल्ला मिळालेल्या रुग्णांना आपले तपासणी अहवाल दाखवून दुसरे वैद्यकीय मत घेण्याची संधीही मिळणार आहे.

यशोदा हॉस्पिटलमधील उपचार सुविधांच्या माहितीसाठी संपर्क..

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल, सोमाजीगुडा येथे मेंदू आणि मणक्याच्या विविध आजारांवर उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार सुविधा व वैद्यकीय सेवांची अधिक माहिती मिळवण्यासाठी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी श्री. राम देशमुख यांच्याशी ७९९५५०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed