लेक लाडकी योजनेचा 9 हजार मुलींना लाभ:पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत 4.74 कोटी रुपये वितरित; सीईओ पाटील यांची माहिती

0
c6ba1e70-55f7-4108-89fb-2759166511b4_1776519620423.jpg




पुणे जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत ९ हजार ४८२ मुलींना लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या या मुलींना मागील तीन वर्षांत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. योजनेच्या पहिल्या हप्त्यांतर्गत प्रत्येक लाभार्थीला ५ हजार रुपये दिले जातात. २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये आणि २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. ‘लेक लाडकी’ योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे, मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा आहे. याशिवाय, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठीही ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेसाठी काही अटी व शर्ती आहेत. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे, त्यांचे बँकेत खाते असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील एक किंवा दोन मुलींसाठी लागू आहे. जर कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर मुलीला या योजनेचा लाभ मिळतो. योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, इयत्ता सातवीत ७ हजार रुपये, इयत्ता अकरावीत ८ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी योजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी ही माहिती दिली.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks