हायकूचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते:कवी विजय पाडळकर यांचे 'हायकू – जागर' कार्यक्रमात मत

0
defdf6fc-a5f7-45ec-982d-932eac878a76_1776508088801.jpg




हायकू काव्यप्रकार परकीय नसून त्याचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते आहे, असे मत हायकू काव्यप्रकाराचे अभ्यासक आणि कवी विजय पाडळकर यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे जागतिक हायकू कविता दिनानिमित्त आयोजित ‘हायकू – जागर’ या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दिपाली दातार यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत पाडळकर म्हणाले की, हायकू हे केवळ ‘वृत्त’ नसून ती एक ‘वृत्ती’ आहे. हा काव्यप्रकार चिंतनशील असून आशावादी साहित्याचा उत्तम नमुना आहे. हायकूकार दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, परंतु त्याला शरण जात नाही. यासाठी चिंतनशील वृत्ती आणि सातत्यपूर्ण लेखन आवश्यक आहे. यावेळी विजय पाडळकर यांच्या ‘हायकूऋतू’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या हस्ते झाले. ‘हायकूऋतूः मुखपृष्ठ-विचार’ या विषयावर चित्रकार शिरीष घाटे आणि कलासमीक्षक शरद तरडे यांनी मांडणी केली. प्रख्यात हिंदी साहित्यिक मनमोहन चड्डा यांनी पाडळकर यांच्या निवडक हायकूंच्या हिंदी अनुवादाचे वाचन केले. अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर यावेळी उपस्थित होत्या. पाडळकर यांनी हायकूचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, हा काव्यप्रकार त्यांच्यासाठी ध्यानस्थ अवस्थेपेक्षा वेगळा नाही. निसर्गाशी तादात्म्य पावत तो प्रसूत होतो. हा अल्पअक्षरी काव्यप्रकार असून, तीन ओळींची कविता असे त्याचे थोडक्यात वर्णन करता येईल. हायकूच्या अंतरंगात एक लय असते. तो नियमबद्ध ठिपक्यांची रांगोळी नसून विखुरलेल्या ठिपक्यांची रांगोळी आहे, ज्यात वाचकाने स्वतःच्या मनातील आशयाचा शोध घेत ते ठिपके जोडायचे असतात. भारतात हायकू हा काव्यप्रकार सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी आणला आणि बंगाली भाषेत तो प्रस्थापित केला. मराठीत हा काव्यप्रकार आणण्याचे श्रेय शिरिष पै आणि शांता शेळके यांना जाते. ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या प्रेरणेतून पै यांनी हायकूमध्ये भरीव काम केले. तत्कालीन प्रस्थापित कवींनी हायकू काव्यप्रकार तितकासा न स्वीकारल्यामुळे भारतात हायकू काव्यचळवळ क्षीण झाली. प्रस्थापित कवींनी यावर कविता न लिहिल्याने समीक्षकांनीही या साहित्य प्रकाराची नोंद घेतली नाही किंवा त्याची समीक्षा केली नाही. समीक्षकांनी दुर्लक्षित केल्यामुळे हायकू काव्यप्रकाराचा अभ्यासक्रमात समावेश होऊ शकला नाही.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks