उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मतभेद उघड:महिला आरक्षणावरून ठाकरेंच्या गटात फूट? प्रियांका चतुर्वेदींच्या वक्तव्याने खळबळ

0
730-x-548-new-2026-04-18t090621360_1776483388.jpg




महिला आरक्षण विधेयकावरून देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असताना, ठाकरेंच्या शिवसेनेतही अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. संसदेत महिला आरक्षणाशी संबंधित 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक असलेला दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडली. त्यामुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचे समोर आले. मात्र, प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या भूमिकेला विरोध करत या विधेयकाचे उघड समर्थन केले. विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खद दिवस असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. संसदेत किंवा विधानसभेत प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मोठी निराशाजनक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रियांका चतुर्वेदी यांनी आपली भूमिका अधिक ठाम करत, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर मी सातत्याने समर्थन करत राहणार असल्याचे सांगितले. मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही. कोणाला माझी भूमिका मान्य नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून त्यांनी दूर जात स्वतःचा वेगळा मार्ग निवडल्याचे दिसून येत आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका चतुर्वेदी या ठाकरे गटात नाराज आहेत का, आणि त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या भूमिकेला पहिलं बंड म्हणून पाहिले जात असून, भविष्यात त्या नव्या राजकीय पर्यायाचा विचार करू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला होता. पुन्हा एकदा राज्यसभेत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, महाविकास आघाडीने शरद पवार यांना एकमताने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची संधी हुकली. यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच होती. चतुर्वेदी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात याच पार्श्वभूमीवर, प्रियांका चतुर्वेदी या भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात असले, तरी अंतिम निर्णयात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता पुढील राजकीय वाटचालीसाठी त्या कोणता मार्ग निवडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks