वाढदिवसाला हारतुरे नकोत, गोमातेच्या चाऱ्यासाठी मदत करा! गो सेवक बिरबल यादव यांचे समाजहिताचे आवाहन; अनोख्या उपक्रमाची चर्चा
नांदेड (प्रतिनिधी)- वाढदिवस म्हटला की भव्य सोहळे, फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचे मोठे हार असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या डामडौलाला फाटा देत समाजाप्रती आपले काही देणे लागते, या भावनेतून प्रसिद्ध गौसेवक बिरबल यादव यांनी एक स्तुत्य आवाहन केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त हारतुरे किंवा महागड्या भेटवस्तू न आणता, तोच पैसा गोमातेच्या चाऱ्यासाठी देऊन पुण्य पदरी पाडावे,असे आवाहन त्यांनी आपल्या मिञपरिवार व हितचिंतकांना केले आहे.
बदलती मानसिकता, मदतीचा हात
बिरबल यादव हे गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत. सध्याच्या काळात चारा टंचाई आणि गोशाळांची आर्थिक ओढताण पाहता, वाढदिवसाचा खर्च टाळून तो सत्कारणी लावावा, असा त्यांचा मानस आहे. यादव म्हणाले की, फुलांचे हार काही तासांत सुकून जातात, पण त्याच पैशातून जर एखाद्या गायीला चारा मिळाला, तर ते खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसाचे सार्थक ठरेल.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
बिरबल यादव यांच्या या निर्णयाचे सामाजिक आणि राजकीय स्तरातून मोठे कौतुक होत आहे. दिखाव्याच्या दुनियेत प्राण्यांप्रती आणि समाजाप्रती असलेली ही संवेदनशीलता इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी आतापासूनच गोशाळांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.
गोसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मला फुले नकोत, तर गोमातेच्या मुखात दोन घास पडावेत, हीच माझी इच्छा आहे.
— बिरबल यादव (गो सेवक)
