दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची सजावट:शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेक सेवा




शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाच्या आकर्षक पुष्पप्रतिकृतींनी सजावट करण्यात आली होती. गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या विशेष प्रसंगी विदुषी शैला दातार यांच्या स्वराभिषेकाचेही आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ही विशेष सजावट करण्यात आली होती. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता विदुषी शैला दातार यांनी स्वराभिषेकातून गणरायाच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली. दिवसभरात मंदिरात विविध अभिषेक आणि गणेश याग देखील संपन्न झाले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी या प्रसंगी माहिती दिली की, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले, ज्याला त्यांनी ‘मायाकर’ असे नाव दिले. मायाकराला अनेक वरदान मिळाल्यानंतर त्याने विप्रचित्ती नामक राक्षसाच्या मदतीने पृथ्वी, स्वर्गलोक जिंकले आणि नंतर पाताळावरही आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी अखेरीस भगवान गणेशांचे स्मरण केले. श्रीशेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले. याच अवतारात भगवान श्री गणेशांनी गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी आणि सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तीने युक्त असलेले मूषक हे वाहन म्हणून स्वीकारले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुराचा वध केल्यामुळे या श्रीशेषात्मज अवताराला ‘श्रीमूषकग’ असेही नाव प्राप्त झाले, असे रासने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *