![]()
अचलपूर येथे विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रात मोबाईल बाळगल्याप्रकरणी एका काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्राध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी (SDO) बळवंतराव अरखराव यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले. अचलपूर आणि चांदूरबाजार येथील एकूण ६९ मतदारांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदान केंद्रात मोबाईलसह कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापरास सक्त मनाई होती. या नियमांचे उल्लंघन करत अचलपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १३-ब चे काँग्रेस नगरसेवक मोहम्मद सईद मोहम्मद सादिक यांनी मोबाईल फोन सोबत घेऊन मतदान कक्षात प्रवेश केला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मतदान करत असताना त्यांनी मोबाईलचा वापर केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ परतवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्वरित कारवाई करत, निवडणूक प्रक्रियेतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोहम्मद सईद मोहम्मद सादिक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम १२८ व १३२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ठाणेदार सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अचलपुरात काँग्रेस नगरसेवकावर गुन्हा दाखल:मतदान केंद्रात मोबाईल वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई
