प्रशासकीय फेरबदल:राज्यात 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूर जिल्हा परिषदेसह पर्यटन संचालनालयात खांदेपालट

0
new-project-2026-04-15t215306127_1776270163.jpg




राज्य शासनाने आज (१५ एप्रिल) प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत पाच सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईचे पर्यटन संचालक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदांचा समावेश आहे. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांची ट्रान्सफर करण्यात आली होती, तत्पूर्वी 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली, तर काहींना सचिवपदी जबाबदारी मिळाली होती. आज आणखी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे तपशील खालीलप्रमाणे: १. डॉ. बी. एन. पाटील (IAS: २०१४): मुंबईचे पर्यटन संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. बी. एन. पाटील यांची आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई अंतर्गत असलेल्या ‘रुसा’ (RUSA) प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. २. मंगेश जोशी (IAS: २०१५): पुण्यातील ‘यशादा’ (YASHADA) येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत असलेले मंगेश जोशी यांची वर्णी आता मुंबईचे नवे पर्यटन संचालक म्हणून लागली आहे. ३. कुलदीप जंगम (IAS: २०२०): सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत असलेले कुलदीप जंगम यांची बदली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. ४. कुशल जैन (IAS: २०२२): गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे प्रकल्प अधिकारी (ITDP) आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले कुशल जैन यांची पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ५. रेवया डोंगरे (IAS: २०२३): धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रेवया डोंगरे यांची बदली आता यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे प्रकल्प अधिकारी (ITDP) आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks